पेट्रोल युगाचा अस्त


तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे गेल्या आठवड्यात झालेल्या जागतिक पेट्रोलियम कॉंग्रेस या अधिवेशनात या पुढे डिझेल आणि पेट्रोल या इंधनाचा वापर वरचेवर कमी होत जाणार असल्याच्या वस्तुस्थितीची जाणीव तीव्रतेने प्रकट झाली. कारण या अधिवेशनात गेल्या दहा वर्षातल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीचा आढावा घेण्यात आला तेव्हा या इंधन तेलाच्या किंमती वाढण्याच्या ऐवजी वरचेवर कमी होत गेल्याचे लक्षात आले. २००८ साली कच्च्या डिझेलचा दर एका बॅरलला १४५ डॉलर्स एवढा होता. तो सतत वाढत जाऊन २०० ते ३०० डॉलर्स प्रति बॅरल असा होईल असा अंदाज आंतरराष्ट्रीय बाजारात व्यक्त केला जात होता. परंतु अलीकडच्या १०० वर्षातला मानवतेचा इतिहास पाहिला असता असे लक्षात येते की अशा प्रकारचे आर्थिक अंदाज बदलत्या तंत्रज्ञानामुळे नेहमीच कोलमडून पडले आहेत. डिझेलच्या किंमतीतसुध्दा असेच घडले. २००८ सालचा १४५ डॉलर्स प्रति बॅरल हा दर वाढण्याच्या ऐवजी या दहा वर्षामध्ये ४५ डॉलर्स प्रति बॅरल असा कोसळला आहे. वाहनांच्या वाढत्या वापरानुसार हे दर वाढतील असे वाटत असतानाच ते कमालीचे घसरले आहेत.

या दरांवर नव्या तंत्रज्ञानाचा म्हणजे नव्या नव्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा परिणाम झालेला आहे. एक काळ असा होता की डिझेल किंवा पेट्रोल याशिवाय दुसरे इंधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे इंधनासाठी सारे जग याच दोन खनिज तेलांवर अवलंबून होते. निसर्गाने जगातल्या काही विशिष्ट देशांनाच खनिज तेलाची देणगी दिलेली आहे. त्यानुसार अरबस्तानातील आणि उत्तर आफ्रिकेतील काही देश हे तेलसंपन्न ठरलेले आहेत. सार्‍या जगाचे व्यवहार या तेलांवर अवलंबून होते आणि तेल हे केवळ याच देशात सापडत होते. त्यामुळे या देशांनी सार्‍या जगाला तेलाच्या किंमतीवरून वेठीस धरले होते. सार्‍या जगाची अर्थव्यवस्था या तेलसंपन्न देशाच्या लहरीनुसार तेजी किंवा मंदीचे झोके घेत होती. पण आता तंत्रज्ञान बदलले आहे आणि डिझेलच्या पेट्रोलच्या जागेवर आता इलेक्ट्रिक कार वापरात यायला लागल्या आहेत. गेल्या ५० वर्षांपासून डिझेल आणि पेट्रोलवरचे मानवतेचे अवलंबन कमी व्हावे यासाठी बरेच संशोधन केले गेले. अनेक प्रकारचे पर्याय तपासण्यात आले. त्यात काही ठिकाणी जैव इंधन हा पर्याय सापडला. नंतर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचेही पर्याय शोधले गेले आणि आता विद्युत शक्तीवर चालणार्‍या कार वापरात यायला लागल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या पर्यायी इंधनांनी डिझेल आणि पेट्रोलची जागा घेतली.

अमेरिकेत गेल्या १० वर्षांपासून हळूहळू स्थानिकरित्या तयार करण्यात आलेले पर्यायी इंधन वापरायला सुरूवात झाली. त्यामुळे अमेरिकेने अरबस्तानातून तसेच उत्तर आफ्रिकेतून डिझेलची आयात करणे कमी केले. सार्‍या जगाच्या इंधन तेलाच्या वापरापैकी २३ टक्के वापर एकट्या अमेरिकेचा असतो. मग एवढे मोठे गिर्‍हाईक इंधन तेलाची मागणीच करेना त्यामुळे गेल्या १० वर्षात डिझेल आणि पेट्रोलचे भाव कोसळत गेले. आता अमेरिकेच्या पाठोपाठ युरोपातल्या काही देशांनी पेट्रोल आणि डिझेलचे अवलंबन शून्यावर आणायला सुरूवात केली आहे. फ्रान्समध्ये गेल्या आठवड्यात डिझेल किंवा पेट्रोलवर चालणार्‍या मोटारींना १०० टक्के बंदी करण्यात आली. म्हणजे यापुढे फ्रान्समध्ये मोटारकार चालवण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेल मागवले जाणार नाही. जर्मनीमध्ये सौर ऊर्जेच्या बाबतीत खूप संशोधन झाले आहे. त्यामुळे तिथे पारंपरिक ऊर्जेचा पर्याय म्हणून सौर ऊर्जा वापरली जात आहे. परिणामी, डिझेल आणि पेट्रोलची मागणी घसरत चालली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले या इंधन तेलाचे दर कोसळत आहेत.

सौर ऊर्जेचा वापर सुरू होण्याच्या काळात ही ऊर्जा फार महाग पडत होती. त्यामुळे परंपरागत वीज निर्मितीचे तंत्रज्ञान आणि खनिज तेलांचा वापर म्हणावा तेवढा घटला नाही. मात्र वरचेवर सौर ऊर्जा स्वस्त होत चालली आहे. त्याचबरोबर विविध देशांनी पर्यायी इंधनांचा वापर वाढवला आहे. जगाच्या इंधन तेलाच्या वापरामध्ये चीन आणि भारत यांचाही हिस्सा मोठा आहे. जागतिक उत्पादनाच्या ८ टक्के एवढे खनिज तेल एकटा चीन वापरतो आणि ३ टक्के एवढे खनिज तेल भारत देश वापरतो. आता याही दोन देशांनी सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे याही देशातून खनिज तेलाची मागणी घटण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम खनिज तेलांच्या दरावर दिसणार आहेत. एकंदरीत आता हळूहळू खनिज तेलांचा जमाना संपत यायला लागला आहे. त्यामुळे अरबस्तानातल्या देशांचे वैभव आता लोपायला सुरूवात होणार आहे. जगातले काही श्रीमंत देश हे पेट्रोलमुळे श्रीमंत झाले होते. त्यांच्या त्या वैभवाने जागतिक राजकारणात त्यांना महत्त्व आले होते. आता त्यांची संपन्नता लोपत चालली म्हणजे त्यांचे हे जगाच्या राजकारणातले महत्त्वसुध्दा कमी व्हायला लागेल. जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू आता बदलून जाईल. या सगळ्या परिवर्तनाची चाहूल पेट्रोल उत्पादक देशांना लागली आहे आणि आपले वैभव टिकवून ठेवण्यासाठी काय करावे यावर ते आता फेरविचार करायला लागले आहेत.

Leave a Comment