‘जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच’


उर्जित पटेल यांचे संसदीय समितीला उत्तर
नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची मोजणी विशेष पथकामार्फत सातत्याने २४ तास सुरू असून त्यांना रविवराखेरीज कोणतीही उसंत मिळत नाही; असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदीय समितीला दिले आहे. टपाल कार्यालये आणि नेपाळमधून अद्याप जुन्या नोटा जमा होत असल्याने त्याचा नक्की आकडा सांगता येणे शक्य नाही; असेही त्यांनी स्पष्ट केले.

समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगतो रॉय यांनी नोटाबंदीनंतर नक्की किती रकमेच्या जुन्या नोटा जमा झाल्या; तसेच किती रकमेच्या नव्या नोटा चलनात परत आल्या याची माहिती गव्हर्नर पटेल यांच्याकडे मागितली होती. नोटाबंदी झाल्यानंतर जमा झालेल्या सुमारे १७ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटांच्या तुलनेत आतापर्यंत १५ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याचे पटेल यांनी समितीला सांगितले.

बंदी घालण्यात आलेल्या नोटा नेपाळमधून अद्याप येणे बाकी असून सहकारी बँकांना त्या जमा करून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशभरातील अनेक ठिकाणच्या टपाल कार्यालयात जमा झालेल्या जुन्या नोटा अद्याप रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या नाहीत; असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment