एअरटेलची VoLTE सेवा या वर्षा अखेरपर्यंत सुरु होणार


नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्वात मोठी कंपनी एअरटेलची व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) सेवा लाँच केली जाईल. या सेवेची चाचणी सध्या पाच शहरांमध्ये सुरु असल्याची माहिती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत-दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी दिली.

नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’ या सेवेची सुरुवात केली. यावर्षी ऑगस्टपासून या सेवेचा लाभ पोस्टपेड ग्राहक घेऊ शकतात. पोस्टपेड ग्राहकांचा महिना संपल्यानंतर प्लॅनमधील उरलेला ३जी किंवा ४जी डेटा पुढच्या महिन्यात दिला जाईल. पण यासाठी ग्राहकांना एक अट असेल. तोच प्लॅन पुढेही चालू ठेवावा लागेल, जो अगोदरच्या महिन्यात चालू होता. अन्यथा डेटाची मुदतवाढ मिळणार नाही.

रिलायन्स जिओ भारतात VoLTE सेवा देणारी एकमेव कंपनी आहे. देशभरात जिओचे १२ कोटी ग्राहक आहेत. जिओने अन्य मोबाईल सेवा पुरवणा-या कंपन्यांसमोर तगडे आव्हान उभे केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत. VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते. एअरटेलने VoLTE सेवा सुरु केल्यानंतर ही सेवा देणारी एअरटेल जिओनंतर दुसरी कंपनी ठरेल. तर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment