पोरकटपणा


भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा तणाव हा युध्दात परिवर्तीत होईल असे अजून तरी वाटत नाही. परंतु भारत, जपान आणि अमेरिका या तीन देशांनी हिंद महासागराशी संबंधित असलेल्या देशांच्या नौदलांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. कदाचित चीन काही दुःसाहस करून हिंद महासागरात काही आक्रमक कारवाया करील अशी शक्यता या तीन देशांना वाटत आहे. ती शक्यता अगदी सुदूर आहे. पण परिस्थिती तणावग्रस्त आहे ही गोष्ट नाकारता येत नाही आणि अशा अवस्थेमध्ये विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून आपण कसे वागले पाहिजे याचे भान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कसे नाही हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. देशाच्या अशा नाजूक अवस्थेमध्ये आणि सीमेवर तणाव असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी एकदिलाने वागले पाहिजे आणि सरकार करत असलेल्या निर्णयांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. हा संकेत आजवर पाळला गेलेला आहे. परंतु राहुल गांधींनी त्याला सुरूंग लावला.

आपल्या देशाचे सरकार चीनबरोबर कसे संबंध ठेवावेत याबाबत अज्ञानी आहे असे सिध्द करण्यासाठी राहुल गांधी स्वतःच चिनी वकिलाला भेटायला गेले. त्यांचे हे भेटणे, भेटीची बातमी गुप्त ठेवण्याचा आटापिटा करणे, या संबंधात कॉंग्रेस पक्षात समन्वय नसल्याचे उघड होणे आणि एवढे करूनसुध्दा राहुल गांधींनी देशाच्या लोकनियुक्त सरकारला ठणकावणे या सगळ्या गोष्टी राहुल गांधींची बौध्दिक आणि नेतृत्वविषयक क्षमता कशी खुजी आहे याचे दर्शन घडवणार्‍या ठरल्या आहेत. सध्या भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. अशा स्थितीत नरेंद्र मोदी जी-२० परिषदेला गेले आणि तिथे चीनच्या पंतप्रधानांना भेटले. परंंतु सीमेवरच्या तणावाविषयी मोदींनी चीनच्या पंतप्रधानांना काहीही सुनावले नाही. म्हणजे नरेंद्र मोदी म्हणजे दुबळे पंतप्रधान आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तणावाच्या स्थितीत एक तर त्यांनी चीनच्या पंतप्रधानांना भेटायला नको होते आणि भेटले तरी चीनच्या अरेरावीबद्दल त्यांना खडसावयला हवे होते, असे राहुल गांधींचे म्हणणे होते. या युक्तीवादातला बालीशपणा आापण क्षणभर बाजूला ठेवू. पण अशा तणावाच्या परिस्थितीत चीनबरोबर असलेले सगळे संबंध तोडले पाहिजेत असे जर राहुल गांधी यांचे म्हणणे असेल आणि तसे ते तोडण्यात कणखरपणा, शौर्य आहे असा त्यांचा युक्तिवाद असेल तर मग स्वतः राहुल गांधी चीनच्या भारतातल्या प्रतिनिधीला भेटायला का गेले होते?

राहुल गांधींनी आपण चीनच्या वकिलाला भेटून एक जटील प्रश्‍न समजावून घेतला आणि तसा आपल्याला अधिकार आहे असे ठणकावून सांगितले आहे. खरे म्हणजे हेसुध्दा म्हणणे चूक आहे. राहुल गांधी कोण आहेत? ते कॉंग्रेसचे एक खासदार आहेत आणि पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे देशाच्या परराष्ट्र खात्याला न सांगता परदेशी वकिलाला जाऊन भेटणे राजशिष्टाचारात बसत नाही. ते पक्षाचे अध्यक्षही नाहीत, लोकसभेतले विरोधी पक्षनेतेही नाहीत आणि परराष्ट्र किंवा संरक्षण खात्यातल्या एखाद्या समितीचे अध्यक्षसुध्दा नाहीत. तेव्हा आपल्याला असा अधिकार आहे असे म्हणताना तो अधिकार त्यांना कसा पोचतो याचा खुलासा त्यांनी करायला हवा होता. देशाच्या सीमेवर तणाव असताना एक विरोधी पक्षाचा खासदार उठतो आणि संबंधित देशाच्या वकिलाला जाऊन भेटतो असा प्रकार आपल्या देशाच्या इतिहासात कधी घडलेला नाही. मग असे असताना राहुल गांधींना चिनी वकिलातीत जाऊन नेमके काय साध्य करायचे होते हे काही समजत नाही आणि तसा काही खुलासा ते स्वतःही करत नाहीत.

उलट देशाचे तीन मंत्री चीनमध्ये का गेलेले आहेत आणि तिथे जाऊन ते चीनचा पाहुणचार का झोडत आहेत असा प्रश्‍न हे सरकारलाच विचारत आहेत. कै. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना चीनबरोबर सीमेवरून तणाव असला तरी वाटाघाटी सुरू राहिल्या पाहिजेत असा दंडक घातला होता. तेव्हा तीन मंत्र्यांनी चीनमध्ये जाणे हे काही चूक नाही आणि कोणालाही न सांगता चीनच्या वकिलातीत जाऊन तिथला पाहुणचार झोडणार्‍या राहुल गांधींना हा प्रश्‍न विचारण्याचा अधिकारही नाही. राहुल गांधी यांनी निर्माण केलेल्या वादाचे हे दौन पैलू आहेत. परंतु या वादाचा तिसरा पैलू कॉंग्रेस पक्षाला हास्यास्पद ठरवणारा झाला आहे. राहुल गांधी चीनच्या वकिलाला जाऊन भेटले ही बातमी पक्षाने गोपनीय ठेवली. परंतु चिनी वकिलातीने ती गोपनीय ठेवली नाही. या वकिलाशी भेटण्यापूर्वी हे भेट गोपनीय रहावी असे कॉंग्रेस पक्षाने आणि राहुल गांधींनी सदर वकिलाला सांगितलेले नसावे त्यामुळे कॉंगे्रस पक्ष ही बातमी गुप्त ठेवत असला तरी चीनच्या वकिलातीने मात्र ती जाहीर केली. ही बातमी जाहीर झाली आहे याचा पत्ता कॉंग्रेसच्या प्रसिध्दी विभागाला नव्हता. मात्र सोशल मीडियावरून या भेटीबाबत चर्चासुध्दा सुरू झाली होती. तेव्हा पक्षाचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी या बातम्यांचा इन्कार केला आणि दुसर्‍या प्रवक्त्यांनी मात्र राहुल गांधींची चिनी वकिलाशी भेट झाली असल्याचे मान्य केले. हा सारा प्रकार कॉंग्रेस पक्षातल्या संघटनात्मक उणिवांवर प्रकाश टाकणारा ठरला आहे.

Leave a Comment