तुमच्या जिओच्या डेटावर मारला जात आहे डल्ला ?


नवी दिल्ली – ग्राहकांच्या सध्या रिलायन्स जिओच्या फ्री इंटरनेट आणि कॉलिंग सेवेवर अक्षरशः उड्या पडत असून १० कोटी ग्राहकांचा टप्पा जिओने आतापर्यंत पार केला असून जिओचा डेटाबेस हॅक झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. जिओचा डेटाबेस हॅक झाल्याचा दावा एका वेबसाइटने केला आहे. ग्राहकांचा डेटाबेस सुरक्षित असून, अशा बातम्या नेमक्या कशामुळे व्हायरल झाल्या आहेत, त्याचा कंपनी तपास करत आहे, अशी माहिती रिलायन्स कंपनीकडून देण्यात आली आहे.

रिलायन्सच्या जवळपास १ कोटी २० लाख ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. पण अद्याप या वृत्ताला कंपनीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. एवढ्या मोठ्या संख्येने ग्राहकांचा डेटा हॅक झाल्यास भारतातील सर्वात मोठा डेटाबेस हॅक होण्याचा प्रकार ठरू शकते. रिलायन्स जिओचा डेटा हॅक झाल्याच्या मेसेजसोबत www.magicapk.com या वेबसाइटची लिंकही शेअर केली जात आहे. या वेबसाइटवर जिओचा नंबर टाकल्यास तुमच्या सिम कार्डची सर्व माहिती उघड होत आहे, असा दावा या मेसेजमधून करण्यात येत होता. सद्यस्थितीत या वेबसाइटची सेवा खंडित करण्यात आली आहे. या वेबसाइटवर जिओच्या सर्वच नंबरची माहिती उघड होत नव्हती. मात्र काही ठरावीक जिओ नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध होत होती. वेबसाइटवर नंबर टाकल्यास ग्राहकांचा मोबाईल नंबर, सर्कल आणि सिम सुरू झाल्याची तारीख दिसत होती, असा दावा त्या मेसेजमधून करण्यात आला होता.

Leave a Comment