आता घरबसल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन


त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वराचे दर्शन इच्छा असूनही काही कारणांनी घेऊ न शकणा-यांसाठी आता आनंदाची बातमी असून लवकरच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचे दर्शन ऑनलाइन उपलब्‍ध होणार असल्यामुळे त्र्यंबकराजाचे दर्शन देश-‌विदेशातील भाविक घरबसल्या घेऊ शकतील. सध्या शिवप्रसाद निवासी खोल्यांचे ऑनलाइन बुकिंग व देणगी दर्शन पावतीचीही ऑनलाइन बुकिंग सुविधा निर्माण करण्यात येत असल्यामुळे निवासाची व दर्शनाची गैरसोय टळणार आहे.

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेताना चार ते पाच तास प्रतीक्षा करूनही काही सेकंदच दर्शन होत असल्यामुळे भाविक नाराज होतात. देश-विदेशातील भाविकांना ऑनलाइन दर्शन सुरू झाल्यास याचा लाभ होईल. त्र्यंबकेश्वरमधील शिवलिंग कसे आहे, याची माहिती मिळाल्यास भाविकांचेही समाधान होणार आहे. यासाठी देवस्‍थान ट्रस्टच्या वेबसाइटचे अपग्रेडेशन सुरू आहे.

तसेच सध्या देणगी दर्शन पावतीचा २०० रुपये दर आहे. ही पावती देऊन उत्तर दरवाजाने थेट दर्शनास जात येते. ऑनलाइन सुविधा झाल्यास काही ठराविक संख्येपर्यंत भाविकांना ही सुविधा दिली जाणार आहे. बुकिंग केल्यानंतर २४ तासांत दर्शन घेण्याची मर्यादा असेल. दूर अंतरावरून नियोजन करून येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.

Leave a Comment