यंत्रमानव पत्रकारांसाठी गुगल देतेय 622,000 पौंड


दररोज एक हजार बातम्या लिहिणारे यंत्रमानव (रोबो) पत्रकार तयार करण्यासाठी गुगल तब्बल 622,000 पौंड खर्च करत आहे. प्रेस असोसिएशन (पीए) नावाची संघटना हा प्रकल्प राबवित आहे.

गुगलच्या डिजिटल न्यूज इनिशिएटिव्ह (डीएनआय) नावाच्या प्रकल्पातून हा निधी पुरवठा करण्यात येत आहे. या अंतर्गत तीन वर्षांमध्ये 132 दशलक्ष पौंड देण्यात येणार आहेत. संपूर्ण युरोपच्या वृत्तव्यवसायातील डिजिटल पत्रकारितेत चैतन्य आणण्यासाठी व नाविन्यतेला आधार देण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात येत आहे, असे कंपनीच्या वतीन सांगण्यात आले.

हा प्रकल्प पुढील वर्षी सुरू होणार आहे. “रिपोर्टर्स अँड डाटा अँड रोबोट्स (रडार)” असे या प्रकल्पाचे नाव आहे. अर्ब्स मीडिया नावाच्या स्टार्ट अप कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प चालणार आहे.

हे रोबो पत्रकार इंटरनेटवरून उपलब्ध माहिती घेतील आणि नॅच्युरल लँग्वेज जनरेशन (एनएलजी) या सॉफ्टवेयरच्या मदतीने आपली बातमी लिहितील. ही माहिती पाच मानवी पत्रकार ठरवतील. सरकारी खाती, स्थानिक अधिकारी इत्यादी ठिकाणावरून ती घेण्यात येईल., असे पीएने म्हटले आहे. स्वतंत्र प्रकाशक आणि स्थानिक ब्लॉगर्सना या प्रकल्पाचा फायदा होईल, असे पीएचे मुख्य संपादक पीट क्लिफ्टन यांनी बीबीसीला सांगितले.

Leave a Comment