जानेवारीपासून सर्व मोबाईलसाठी जीपीएस अनिवार्य


टेलिकॉम विभागाने जानेवारी २०१८ पासून सर्व मोबाईल हँडसेटसाठी जीपीएस देणे अनिवार्य केले आहे. हँडसेट उत्पादक कंपन्यांनी टेलिकॉम विभागाला यामुळे मोबाईलच्या किमती ३० टक्कयांनी वाढतील असा इशारा दिला होता मात्र टेलिकॉम विभागाने उत्पादकांचे हे म्हणणे खोडून काढले आहे. महिलांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे व मोबाईल इंडस्ट्रीच्या कोणत्याही मागणीवर यापुढे विचार केला जाणार नाही असेही या विभागाने स्पष्ट केले आहे. जीपीएसमुळे मोबाईल ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

टेलिकॉम विभागाने ४ जुलै रोजी इंडियन सेल्यूलर असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात आणीबाणीच्या परिस्थितीत युजरचा ठावठिकाणा समजण्यासाठी जीपीएस हेच मुख्य टूल असल्याचे व १ जानेवारीपासून सर्व हँडसेटना हे टूल बसविणे अनिवार्य असल्याचे कळविले आहे. सरकारने १ जानेवारी २०१७ पासून सर्व फोनसाठी पॅनिक बटण व १ जानेवारी २०१८ पासून जीपीएस प्रणाली बसविण्याचे आदेश अगोदरच दिले होते त्यानुसार १ जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटण फोनमध्ये दिली जात आहेत.

Leave a Comment