चोरीचे मोबाईल होणार निकामी


मोबाईल चोरी, सिम बदलणे अथवा आयएमईआय नंबर बदलण्याचे प्रयत्न करणार्‍यांसाठी एक वाईट बातमी आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारे लंपास केले गेलेले मोबाईल निकामी होतील अशी नवी सेवा प्रणाली आणण्याचा निर्धार केला असून बीएसएनएलने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंडटीटी रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअरची जबाबदारी घेतली आहे. यासाठी पुण्यातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी सहा महिने परिक्षणे नोंदविली जाणार आहेत. या नव्या प्रणालीचा मुख्य उद्देश मोबाईल चोरीला आळा घालण्याबरोबरच नकली मोबाईलची संख्या कमी करण्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर ग्राहकहित सांभाळले जाणार आहे.

या नव्या प्रणालीनुसार मोबाईल चोरीस गेला, अथवा त्याचे सिम बदलले गेले किंवा जागतिक उदयोग संघटनेकडून प्रत्येक मोबाईल ग्राहकाला दिला जात असलेल्या आयएमइआय या पंधरा आकडी नंबरात फेरफार केला जात असेल तर संबंधित मोबाईलची सर्व नेटवर्क काम करणे थांबविणार आहेत. त्याचबरोबर आवाज पकडून तपास यंत्रणांसाठी रस्ता खुला केला जाणार आहे. त्यात नवी सीइआयआर प्रणाली आयएमईआय डेटा सर्व मोबाईल ऑपरेटसह जोडणार आहे. मोबाईल हरविला असेल तर तक्रारदाराला आयएमईआय नंबर द्यावा लागतो. अनेकदा त्यात फेरफार करून चोरीचे मोबाईल पुन्हा विक्रीसाठी येत असतात. मोबाईल चोरी हे केवळ ग्राहकाचे आर्थिक नुकसान नसते तर त्यामुळे त्याच्या वैयक्तीक तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठीही धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन बनावट मोबाईल ओळखता यावेत यासाठी ही प्रणाली वापरात आणली जाणार आहे.

Leave a Comment