लालूप्रसाद अडचणीत


गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बेनामी मालमत्तांच्या संदर्भात सीबीआयच्या रडारवर असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर सीबीआयने काल बेनामी मालमत्तांच्या संदर्भात आणि बेकायदा निविदा काढून भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. २००६ सालचे हे प्रकरण आहे. हा गुन्हा दाखल होत असतानाच सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या १२ शहरातल्या मालमत्तांवर छापे टाकले असून लालूप्रसाद यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि पुत्र तेजस्वी यादव यांच्याही विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी नेते कधी प्रामाणिकपणे आपल्या हातून ही चूक झाली आहे असे कधी कबूल करत नसतात. छगन भुजबळ यांनीही ते केले नव्हते आणि लालूप्रसाद तर याबाबतीत प्रसिध्दच आहेत. चारा घोटाळ्यामध्ये त्यांना शिक्षा झाली आणि एक वर्ष तुरुंगात जावे लागले. खरे म्हणजे ही शिक्षा त्यांना सरकारी तिजोरीवर टाकलेल्या दरोड्याबद्दल झाली होती. परंतु जणूकाही आपण देशसेवा केल्याबद्दल तुरुंगात जात आहोत अशा आविर्भावात ते तुरुंगात गेले होते.

आताही हे खटले दाखल होत असताना त्यांनी दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुडगाव या शहरातील त्यांच्या मालमत्तांवर छापे पडले आहेत. म्हणजे लालूप्रसाद यांच्या काळ्या कमाईची ही दुनिया ओरिसा, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि झारखंड एवढ्या राज्यांमध्ये पसरलेली आहे असे दिसते. त्यांनीसुध्दा आपल्यावरच्या या खटल्यांमध्ये तथ्य नाही अशीच शेखी मिरवलेली आहे. आपण भारतीय जनता पार्टीवर सातत्याने टीका करत असल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आपला सूड घेण्यासाठी हे छापासत्र आरंभिलेले आहे. प्रत्यक्षात आपण गंगेच्या पाण्यापेक्षा निर्मळ आहोत असा दावा त्यांनी केला आहे. आजवर ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सुडाची कारवाई केल्याचा आरोप करत होते. आता तर त्यांनी या कारवाईला विच हंट असे संबोधिले आहे. ग्रामीण भागात एखाद्या महिलेला त्रास द्यायचा असेल किंवा एखाद्या विधवेची मालमत्ता हडप करायची असेल तर काही मतलबी लोक तिला आधी चेटकीण ठरवतात आणि मग तिला मारून टाकून तिची इस्टेट लुबाडतात. आपल्या विरुध्द मोदी सरकारने अशीच कारवाई चालवलेली आहे असाा दावा लालूप्रसाद यादव यांनी केलेला आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर काहीवेळा जातीचा अाधार घेतला तर काही दिवस ते पक्षाच्या आड दडून बसले. पण शेवटी त्यांना आत जावेच लागले.

लालूप्रसाद यादव यांनीही असेच बहाणे सुरू केलेले आहेत. त्यांच्याशिवाय त्यांच्या काही पाठिराख्यांनीही तोच सूर आळवला आहे. लालूप्रसाद यादव यांची भाजपाला फार भीती वाटते. त्यामुळे भाजपाने त्यांना संपवण्यासाठी हा डाव रचला असल्याचा शोध याही पाठिराख्यांनी लावला आहे. राजकीय सूडबुध्दीचा त्यांचा आरोप खरा आहे असे वादासाठी क्षणभर मान्य केले तरी सरकारविरोधात केले जाणारे हे आरोप अगदी तथ्यहीन वाटतात. भाजपा सरकारने त्यांच्यावर सूड उगवला आहे तर यापूर्वी त्यांना चारा घोटाळ्यातून सुटका का मिळाली नाही? त्या प्रकरणात त्यांना शिक्षा झाली तेव्हा भाजपाचे सरकार सत्तेवर नव्हते. उलट ज्यावेळी केंद्रामध्ये लालूप्रसाद यादव यांचेच सरकार होते तेव्हा त्यांच्यावर चारा घोटाळ्यात पहिल्यांदा आरोपपत्र दाखल झाले होते. भाजपाच्या सरकारवर सूडबुध्दीचा आरोप करणे सोपे आहे परंतु स्वतःच्याच सरकारवर आरोप केला तर लोकांचा विश्‍वास बसणे कठीण आहे. मात्र लालूप्रसाद यादव यांच्यावरील कारवाईची सुरूवात त्यांच्याच सरकारने केलेली आहे. हे सत्य काही लपत नाही आणि मोदी सरकारवर ते करत असलेला सूडबुध्दीचा आरोप पूर्ण चुकीचा ठरतो.

आपल्या देशामध्ये कोणतेही सरकार आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर केवळ सूडबुध्दीने कारवाई करू शकत नाही. कारण कारवाई करणारी सीबीआयसारखी यंत्रणा ही सरकारच्या अखत्यारित नाही. काही प्रमाणात ती सरकारवर अवलंबून आहे. परंतु त्याचा वापर करून राजकारणातला बदला घेण्यासाठी अशी कारवाई करता येत नाही. कारण कारवाई एकटे सरकार करत नाही. त्याला न्यायालयाची मान्यता लागते. अन्यथा गुन्हे दाखल करणे, छापे टाकणे आणि अटक करणे अशा कारवाया एकट्या सीबीआयला करता येत नाहीत. लालूप्रसाद गंगेइतके पवित्र असूनही त्यांच्यावर केवळ सूडबुध्दीने कारवाई झाली असती तर त्या कारवाईला न्यायालयाची मंजुरी मिळाली नसती. त्यांच्या विरुध्द केल्या जाणार्‍या आरोपात काहीतरी तथ्य असल्याशिवाय कारवाईची पुढची पावले टाकताच येत नसतात. अशा प्रसंगी लालूप्रसाद न्यायालयांवर सूडबुध्दीचे आरोप करणार आहेत का? सत्तेवर असताना बिनदिक्कतपणे आणि कसलाही संयम न ठेवता हावरटासारखा त्यांनी पैसा ओढलेला आहे आणि आता त्या पापाची परतफेड करण्याची वेळ येताच त्यांना राजकारण सुचायला लागले आहे. कोणताही चोर पकडल्यानंतर कांगावा करतो तसाच लालूप्रसादांचा कांगावा सुरू आहे. त्याला कसलीही किंमत न देता त्यांच्यावरची कारवाई निष्ठूरपणे चालू ठेवली पाहिजे आणि अनैतिकतेच्या कारणावरून लालूप्रसाद यांच्यासारख्या प्रवृत्ती राजकारणातून हद्दपार झाल्या पाहिजेत.

Leave a Comment