दुय्यम शहरांकडे लो कॉस्ट एअरकंपन्यांची नजर


मेट्रो प्रमाणेच दुय्यम दर्जाच्या शहरातील नागरिकांनाही हवाई प्रवासाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्नशील आहे व त्यांच्या या प्रयत्नांना चांगले यश येताना दिसू लागले आहे. कारण स्थनिक विमानकंपन्यांप्रमाणेच अनेक परदेशी लो कॉस्ट एअर कंपन्यांनी या शहरांतून त्यांच्या सेवा देशांतर्गत तसेच परदेशी प्रवासासाठी सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे मेट्रो शहरातून हवाई प्रवासासाठी जेवढे भाडे आकारले जाते त्यापेक्षा ४५ टक्के कमी दरात या सेवा दिल्या जात आहेत.

ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल आयशिगो कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्ली, मुंबई, बंगलोर च्या तुलनेत जयपूर, लखनौ, त्रिची यासारख्यां दुय्यम शहरातून सिंगापूर, हाँगकाँगला जाण्यासाठी आकारले जात असलेले भाडे खूपच कमी आहे. लहान शहरात यामुळे लोकॉस्ट एअरलाईन्स कंपन्यांची सेवा सुरू झाली आहे. येथे विमानतळासाठी येणारा खर्च कमी असल्याने कमी किमतीत विमान तिकीटे देणे कंपन्यांना परवडणारे आहे. टायगर, एअर अरेबिया, फ्लाय दुबई यासारख्या लो कॉस्ट एअरलाईन्सनी अशा शहरातून साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट साठी खूपच कमी दरात विमानसेवा दिली आहे व प्रवाशांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Leave a Comment