किंग्डम ऑफ टवोलारा-जगातले सर्वात छोटे राज्य


आजच्या काळात बहुतेक देशातून राजे राजशाह्या नामशेष होऊ लागल्या असल्या तरी इटालीत आजही जगातले सर्वात छोटे राज्य अस्तित्वात आहे. या राज्यात केवळ ११ लोक राहतात तेही पार्टटाईम. म्हणजे ते येऊन जाऊन असतात. या राज्याचे नांव आहे किंग्डम ऑफ टवोलारा आणि येथील राजा आहे अंतोनियो बर्तलियोनी. इटलीच्या सार्वेडिया भागात भूमध्य सागरात हे छोटे बेट आहे आणि विशेष म्हणजे इटलीला देश म्हणून मान्यता मिळण्यापूर्वीपासून ते अस्तित्त्वात आहे.

पाच चौरस किलोमीटरचा घेर असलेल्या या राज्याचा राजा अंतोनियो याने त्याचे सारे आयुष्य हाफ पँट व सँडल्सवरच व्यतीत केले आहे. त्याची स्वतःची नाव आहे व एक रेस्टॉरंट आहे. तो सांगतो, राजा म्हणून मला बाकी कोणतीही सुविधा नाही. फक्त जेवण मोफत मिळते तेही माझेच रेस्टॉरंट असल्यामुळे. या राज्याचा १८० वा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. अंतोनियो त्याच्या पूर्वजांचा सारा इतिहास सांगतो. तो म्हणतो माझे खापरपरजोबा दोन बहिणींशी लग्न करून येथे पळून आले कारण तेव्हा सार्डिनियात दोन विवाह करणे हा गुन्हा मानला जात असे. या बेटावर सोनेरी दातांच्या बकर्‍या सापडतात. त्याची चर्चा इटलीत सुरू झाली तेव्हा सार्डिनियाचा राजा या बेटावर आला. ही कथा १८३६ सालची.


अंतोनियोच्या खापरपणजोबांनी जिवंतपणी कधी मुकुट घातला नाही मात्र त्यांनी या बेटावर कबरीस्तान बांधले व मृत्त्यूनंतर त्यांच्या कबरीवर मुकुट ठेवायला सांगितले. सार्डिनियाच्या राजाने त्याची स्वतःची ओळख करून दिली तेव्हा अंतोनियोच्या या पूर्वजानी तेही या बेटाचे राजे असल्याचे सांगितले व राजाने ते मान्य केले. १९ व्या शतकात ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरियाने जगभरातील राजांचे फोटो जमा करायला सुरवात केली तेव्हा या राजाचा त्याच्या परिवारासह फोटो काढला गेला होता व तो बराच काळ बकींहम पॅलेसमध्ये लावलेला होता. आता हा फोटो अंतोनियोच्या रेस्टॉरंटमध्ये आहे. १९६२ साली येथे नाटो सैनिकांचा तळ उभारला गेला होता.

आजही या बेटाला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात व अंतोनियो त्याच्या नावेतून पर्यटकांना येथे घेऊन येतो. या राज्याला जगाने मान्यता दिलेली नाही. या बेटावरच्या बकर्‍या व बहिरी ससाणे खूप प्रसिद्ध आहेत. अंतोनियो दररोज त्याच्या पत्नीच्या कबरीवर फुले अर्पण करतो पण ती प्लॅस्टीकची असतात. ताजी फुले बकर्‍या खाऊन जातात असे त्यामागचे कारण अंतोनियो सांगतो.

Leave a Comment