भाजप देणार ‘जीएसटी सल्लागार’ व्हायचे प्रशिक्षण!


माल व सेवा कर (जीएसटी) ही कर कमी करण्याची यंत्रणा आहे, याची जागरूकता आम्ही पसरवत आहोत. आम्ही लोकांना ‘जीएसटी सल्लागार’ व्हायचे प्रशिक्षण देत आहोत, असे भारतीय जनता पक्षाच्या तमिळनाडू प्रदेश अध्यक्षा तमिळीसै सौंदरराजन यांनी म्हटले आहे.

चेन्नई येथील कमलालयम या भाजपच्या राज्य कार्यालयात जीएसटीबाबत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या संबंधात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तसेच जीएसटीवरील एका वेब पोर्टलचे उद्घाटन केले आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावरील एका अॅपचे उद्घाटनही केले.

यावेळी बोलताना सौंदरराजन म्हणाल्या, “वेबसाईट व लोकांना प्रत्यक्ष भेटून आम्ही येत्या काही दिवसांत जनजागृती करण्याची योजना तयार केली आहे. आम्ही पहिल्यांदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत जागांना भेट देण्याचे ठरविले आहे. या संदर्भात पहिल्यांदा चेन्नईत 10 जागा ठरविल्या आहेत. अशा जागा आम्ही संपूर्ण तमिळनाडूत निश्चित करत आहोत. जीएसटी सल्लागार होऊ इच्छिणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देण्याचेही आम्ही आखत आहोत. यामुळे लाखो रोजगार तयार होतील. या अभ्यासक्रम करण्यासाठी संगणकाचे ज्ञानही पुरेसे आहे.”

Leave a Comment