देश मोलोसिया- लोकसंख्या ३३


जगात अगदी छोट्यात छोटा देश असला तरी तेथील छोट्यात छोट्या नेत्यासाठीही मागे पुढे सुरक्षेचा काफिला आपल्याला सहज पाहायला मिळतो. पण या भूतलावर एक देश असाही आहे, ज्या देशाचे राष्ट्रपती कोणत्याही प्रकारची सुरक्षा न घेता रस्त्यातून बिनधास्त फिरतात, इतकेच नव्हे तर येथे आलेल्या पर्यटकांना स्वतःच त्यांच्यासोबत फिरून इमारतींची माहितीही देतात. या देशाची लोकसंख्या आहे केवळ ३३ व त्यात ४ कुत्रीही सामील आहेत. होय! या देशांत कुत्र्यांनाही नागरिकत्व दिले जाते.

वरील वर्णन वाचून आपली उत्सुकता नक्कीच वाढली असेल. हा देश अमेरिकेच्या नेवाडा भागात आहे. देशाचे नांव आहे मोलोसिया. या देशाचे स्वतःचे कायदे कानून आहेत, परंपरा आहेत व स्वतःचे चलनही आहे. हा स्वयंघोषित देश असून त्यांचा पासपोर्टही दिला जातो. देशाचे राष्ट्रपती आहेत केविन वॉघ. गम्मत अशी की केविन व त्यांच्या एका मित्राच्या डोक्यात आपला स्वतंत्र देश असावा अशी आयडिया आली व त्यातूनच त्यांनी मोलोसियाची स्थापना केली. कांही काळाने मित्र या देशाच्या कल्पनेतून बाहेर पडला मात्र केविन येथेच राहिले. आता ते देशाचे राष्ट्रपती असून त्यांनी स्वतःला हुकुमशहा घोषित केले आहे. त्याची पत्नी या देशाची फर्स्ट लेडी आहे तर बाकी नागरिक त्यांचेच नातेवाईक आहेत. या देशाला कोणत्याही देशाच्या सरकारने मान्यता दिलेली नाही.


या छोट्याशा देशाची अर्थव्यवस्था पर्यटकांवरच अवलंबून आहे. येथे स्टोअर्स, लायब्ररी, स्मशान अशा अनेक सुविधा आहेत. येथे निवासी असे एकच घर आहे व बाकी इमारतींत पर्यटकांची व्यवस्था केली जाते. येणार्‍या पर्यटकांना त्यांच्या पासपोर्टवर प्रवेशाचा स्टँप घ्यावा लागतो.१९७७ साली स्थापन झालेल्या या देशाने आता ४० वर्षे पूर्ण केली आहेत. दोन तासात या देशाची सहल करता येते व देशाची सारी माहिती केविनच देतात. येथे छोटेसे कस्टम ऑफिस आहे मात्र कस्टम ऑफिसर कुणाशी बोलत नाही कारण येथे अधिकारी म्हणून एक पुतळा ठेवला गेला आहे. येथे पोस्ट ऑफिसही आहे. खरेदी करण्यासाठी अनेक दुकाने आहेत व पर्यटक येथे खरेदी करतातही. देशाचे चलन आहे वलोरा व त्यावर केविन याचा फोटो व नांव आहे.

Leave a Comment