अत्याचाराची बळी मुले


लहान मुलांवरील अत्याचार, त्यांना होणारी मारहाण, त्यांचा होणारा छळ आणि त्यांचे होणारे लैंगिक शोषण हे तसे काळजीचे विषय असतात. यातला एखादा प्रकार घडल्यानंतर आपल्याला तो फारसा गंभीर वाटत नाही. परंतु लहान वयाची मुले आणि मुली मनाने फार संवेदनशील असतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात यातली कुठलीही एक गोष्ट घडली तरी त्यांच्या मनाला चर्रा पडतो आणि तो जन्मभर त्याच्या स्वभावावर आणि वर्तनावर परिणाम करत राहतो. किंबहुना अशा प्रकारचे अत्याचार सहन करत मोठी झालेली मायेच्या पाखरीला वंचित झालेली मुले समाजातल्या कोणत्याच घटकाविषयी सहानुभूती बाळगत नाहीत. आपल्यावर लहानपणी कोणी प्रेमाचा वर्षाव केलेला नाही. त्यामुळे आपण समाजाविषयी सहानभूती बाळगण्याची काही गरज नाही. अशी त्यांची भावना झालेली असते.

अशी मुलेच मोठी होऊन गुन्हेगार होतात आणि समाजाशी तुसडेपणाने वागायला लागतात. समाजासाठी आपण झिजले पाहिजे, थोडी घस सोसली पाहिजे, त्याग केला पाहिजे. या भावनेपासून अशी मुले फार दूर राहतात. त्यामुळे लहान मुलांचे बालपण हे प्रमाने आणि सहानुभूतीनेच पार पडले पाहिजे, असा मानसशास्त्रज्ञांचा आग्रह असतो. आपल्या समाजातली मुले कशी जगत आहेत याची पाहणी करण्यासाठी यूनिसेफ या संघटनेने एक प्रकल्प हाती घेतला. यूनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारितली एक सामाजिक संघटना आहे. तिने लातूर, जालना, यवतमाळ, रायगड, मुंबई, पुणे, नंदूरबार आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या ५ हजार मुलांची चौकशी केली. तेव्हा असे आढळले की मुलींपेक्षा मुलांवर लहान वयात असे आघाता जास्त होतात.

अनेक मुलांना अजूनही जातीवरून हेटाळणीची वागणूक मिळते. काही अपंग मुलांना त्यांच्या व्यंगावरून उपेक्षेची वागणूक दिली जाते. जाहीरपणे त्यांना हिणवले जाते, असे अनेक मुलांनी सांगितले. वसतीगृहात किंवा आश्रमशाळांमध्ये राहणारी मुले अशा छळाला मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. त्यांच्याकडून श्रमाची कामे करून घेणे आणि त्यांना खाण्यास कमी देणे इत्यादी प्रकार त्यांच्या बाबतीत चालत असतात. अनेक मुलांना बालमजुरी करावी लागते. मुलांवर जास्त अत्याचार होतात पण मुलीसुध्दा अत्याचारापासून पूर्णपणे मुक्त नाहीत. त्यांनाही काही अत्याचारांना बळी पडावे लागते. बालकांच्या हक्कांच्या घोषणा आपण खूप करतो परंतु आपला समाज त्यांच्या संरक्षणाबाबतीत किती बोथट आहे हे या पाहणीवरून लक्षात येते.

Leave a Comment