क्रेडिट कार्डवर डबल जीएसटी लागणार ही निव्वळ अफवा


नवी दिल्ली: १ जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर वेगवेगळ्या अफवांना सोशल मीडियात पूर आला आहे. अनेकांना त्यामुळे अजूनही याबाबत खरी माहितीच नाही. अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर व्हायरल झालेल्या मेसेजेसवर विश्वास ठेवून डोक्याला ताण करून घेत आहेत. अशातच एक अफवा सोशल मीडियातून फिरत होती, टेलिफोन, मोबाईल, गॅस, वीजबिलं भरताना क्रेडिट कार्डचा वापर केल्यास दोनवेळा जीएसटी भरावा लागेल, असे ज्यात सांगण्यात येत होते. पण ही निव्वळ एक अफवा असल्याचे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले आहे.

व्हाट्सअॅपवर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की, उपयोगी सेवांच्या बिलांवर दुप्पट जीएसटी द्यावा लागेल. एकदा सर्व्हिससाठी तर दुस-यांदा क्रेडिट कार्डमधून खर्च करण्यात आल्यामुळे जीएसटी लागेल असा दावा करण्यात आला होता. लोकांना रोख किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून बिल भरण्याचाही सल्लाही देण्यात येत होता.

पण ट्विटरच्या माध्यमातून ही अफवा असल्याचे आता महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, क्रेडिट कार्डवरुन युटिलिटी बिलाचे पेमेंट केल्यास दोनवेळा जीएसटी भरावा लागेल, असा चुकीचा मेसेज व्हायरल होत आहे. हा मेसेज पुर्णपणे चुकीचा आहे. असे मेसेज सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका. दरम्यान, वस्तूंवर सध्या ज्या किंमती आहेत, त्या जुन्या कर प्रणालीनुसार आहेत. त्यावर पुन्हा जीएसटी लावला जात आहे. मात्र व्यापारी वस्तूवर जीएसटीनुसार स्टीकर लावूनही वस्तूंची विक्री करु शकतात, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment