३० वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर ७६ वर्षांचे आजोबा, ७० वर्षांची आजीचे लग्न


नवी दिल्ली – ३० वर्षे लग्न न करता एकत्र राहिलेल्या जोडप्याने उत्तर प्रदेशमधील मिठौली गावात अखेर वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सारा गाव या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरता या दोघांच्या विवाह सोहळ्याला आला होता. ७६ वर्षांचे नोखेलाल मौर्य यांनी सोमवारी ७० वर्षांच्या रामदेवी यांच्यांशी विवाहबद्ध झाले. या दोघांचे लग्न गावच्या मंडळींनी धुमधड्याक्यात आणि पारंपरिक पद्धतीने लावून दिले.

१९८४ मध्ये नोखेलाल यांनी रामदेवी यांना मिठौली गावात आणले होते. हे दोघेही तेव्हापासून एकत्र राहात आहेत. पण दोघांनी लग्न केले नव्हते. या दोघांना चार मुली देखील आहेत. तर दहा नातवंड देखील आहेत. आपल्या आजीला नववधुसारखे नटवून तिला लग्नमंडपात आणण्यात आल्यानंतर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या काही वर्षांपासून या दोघांवरही लग्न करण्यासाठी घरचे दबाव टाकत होते पण लग्न न करण्याचा यांचा विचार पक्का होता, पण नंतर मात्र ३० वर्षे एकत्र घालवल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment