शेतकरी शेतीतील उत्पन्नाला पुरक व्यवसाय म्हणून गायी म्हशी पाळणे, शेळ्यामेंढ्या पाळणे अथवा पोल्टी फार्म चालविणे अशी कामे करतात हे आपल्याला ऐकून माहिती आहे. मात्र शेतकरी शेतीला पूरक म्हणून साप पाळण्याचा व्यवसाय करतात हे जरा नवल आहे. चीनच्या जिसिकियागो प्रांतातील एका गावात स्नेक फार्मिंग म्हणजे सापांची शेती चांगलीच लोकप्रिय व फायदेशीर ठरली असून या गावात दरवर्षी किमान ३० लाख साप जन्माला येतात असे समजते. या छोट्याशा गावाची लोकसंख्या आहे १ हजार. याचाच अर्थ असा की येथे प्रत्येक माणसामागे दरवर्षी ३० हजार साप निपजतात.
या गावात होते सापांची शेती
या स्नेक फार्मिंगमध्ये विषारी सापांचा भरणा अधिक आहे. म्हणजे येथे कोब्रा, व्हायपर, अजगर यांच्यासह अनेक जातींचे साप आहेत. मात्र येथील स्थानिक या सापातील फाईव्ह स्टेप स्नेक या सापाला अधिक घाबरतात. असे सांगतात या सापाने दंश केला तर पाच पावले चालेपर्यंतच माणसाचा मृत्यू होतो म्हणून त्याचे नांव फाईव्ह स्टेप स्नेक असे आहे. हे साप त्यांची कातडी, मांस, विष यांच्यासाठी पाळले जातात. सापाचे विष व अ्न्य अवयव चीनमध्ये औषधात वापरले जातात तसेच सापाचे मांस चिनी लोकांना भयंकर आवडते.
या शेतीचे सारे श्रेय जाते यांग होंगचेंग या शेतकर्याकडे. तो तरूण असताना आजारी पडला तेव्हा त्याने जंगली साप पकडला होता व सापापासून बनलेल्या औषधाने तो बरा झाला तेव्हाच त्याच्या डोक्यात स्नेक फार्मिंगची कल्पना आली. त्याच्या या शेतीतून त्याला मिळत असलेला फायदा पाहिल्यानंतर अन्य शेतकरीही या व्यवसायाकडे वळले. सध्या या गावात १०० स्नेक फार्म आहेत. लाकडी, काचेच्या बॉक्समधून ठेवलेले साप येथे पाहायला मिळतात. सापांची वाहतूक प्लॅस्टीकच्या पिशव्यांतून केली जाते. साप विकत घेणारे प्रथम त्याचे डोके कापण्यापूर्वी विष काढून घेतात. सापाचे मांस रोगप्रतिकारक शक्ती वाढविते असा या लोकांचा दावा आहे. सापाची शेपटी जेवणात वापरली जाते. उरलेले साप वाळविले जातात व औषधात त्यांचा वापर केला जातो.