पावसाळ्यात आरोग्य सांभाळा


भारतामध्ये तीन ऋतू आहेत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. विषववृत्तावर वसलेला देश असल्यामुळे पावसाळा हा तिसरा ऋतू भारतामध्ये दिसतो. जगात तो वेगळा ऋतू नाही. कारण जगातल्या काही देशात हिवाळ्यात पाऊस पडतो तर काही देशात उन्हाळ्यात पाऊस पडतो. भारतात तसे नाही. पावसाळा वेगळा ऋतू तर आहेच परंतु तो अन्य दोन ऋतूंपेक्षा अधिक रोगट आहे. कारण पावसाळ्यामध्ये हवाही चांगली नसते तसेच या विशिष्ट हवामानात अन्नपचन जड जाते व भूक लागत नाही. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्याच्या ह्या वातावरणात सर्दी, फ्ल्यू, टाईफाईड, हिपॅटिटिस ए, डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो.

हे सारे आजार व्हायरसमुळे पसरतात आणि चांगलेच संसर्गजन्य असतात. त्यामुळे त्यांचा प्रसार वेगाने होतो. म्हणून पावसाळ्यात आपल्या आरोग्याला विशेष करून जपावे लागते. या संबंधात डॉक्टर मंडळी बर्‍याच काही सूचना देत असतात. परंतु ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो की या पावसाळ्यामध्ये अन्न आणि पाणी या दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. अशुध्द पाणी पिणे आणि माशा बसलेले अन्न खाणे या दोन गोष्टी पावसाळ्यात सांभाळल्या नाहीत तर अनेक प्रकारचे विकार उद्भवू शकतात. हे सगळे आजार पसरवणारे जंतू पावसाळ्यातच जोमाने वाढतात. कारण पावसाळ्यातली आर्द्रता ही अशा जंतूंच्या वाढीस अनुकूल असते.

पावसाळ्यामध्ये या दृष्टीने काही सूचना डॉक्टर मंडळी देतात. त्यातली पहिली म्हणजे दिवसभरात जाता येता, खाण्यापूर्वी, जेवणापूर्वी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुतले पाहिजेत. जेवण करताना गरम आणि ताजे अन्नच खावे. हा पावसाळ्यातला एक मोठा सामान्य नियम आहे. कारण गरम अन्न लवकरच पचते आणि थंड झालेले तसेच शिळे अन्न पचायला जड जाते. आधीच हवा अन्न पचनाला योग्य नसते. त्यातच पचायला जड अन्न खाल्ले की अपचन झालेच म्हणून समजा. या काळात पसरणार्‍या विविध विकारांवर उपलब्ध असणार्‍या लशी टोचून घेण्याच्याबाबतसुध्दा आपण दक्ष असले पाहिजे. आपल्या घराच्या आसपास कोठेही पाणी साचू नये यावर लक्ष दिले पाहिजे. कारण साचलेल्या पाण्यातच हे जंतू अंडी घालत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment