स्त्रिया आणि बालकांच्या कवट्या आढळल्याने संशोधक चक्रावले
मेक्सिकोमध्ये आढळला कवट्यांचा मनोरा
मेक्सिको सिटी: शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या उत्खननामध्ये पुरातत्व संशोधकांना मानवी कवट्यांनी सजवलेला मनोरा सापडला आहे. या मनोऱ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिला आणि बालकांच्या कवट्याही आढळल्याने संशोधक चक्रावले आहेत.
टेम्पलो मेयर या शहरातील महत्वपूर्ण मंदिरापासून जवळच सुरू असलेल्या उत्खननात हा मनोरा सापडला आहे. चुना आणि मातीने बनविलेल्या या गोलाकार मनोऱ्यात हजारो मानवी कवट्या आढळून आल्या आहेत. त्यापैकी ६५० कवट्या संशोधकांच्या हाती लागल्या आहेत. स्पेनच्या आक्रमणापूर्वी अस्तित्वात असलेल्या ऍस्टेक साम्राज्याची राजधानी असलेल्या टेनोकटीलॅनमध्ये हा मनोरा आहे. याच ठिकाणी नंतर मेक्सिको शहर वसविण्यात आले.
स्पेनच्या आक्रमणानंतर लयाला गेलेल्या माया अथवा मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये आक्रमकांकडून पराभूतांचे शिरकाण करून त्यांच्या कवट्या सार्वजनिक ठिकाणी विजयाचे प्रतीक म्हणून सजवून ठेवण्याची प्रथा होती. त्या काळी मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेल्या धार्मिक कारणांसाठी नरबळी दिलेल्यांच्या कवट्याही अशा प्रकारे प्रदर्शित करीत असत. मात्र स्त्रिया अथवा मुले युद्धावर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धार्मिक कारणांसाठी महिला अथवा मुलांचा बळी दिले जात असले त्यांचे प्रमाणही अत्यल्प असावे. त्यामुळे या मनोऱ्यात सापडलेल्या कवट्यांमध्ये महिला व मुलांच्या कवट्यांचे मोठे प्रमाण हे मानववंश शास्त्रज्ञांसमोर एक प्रश्नचिन्ह बनून उभे आहे.