पद्मनाभस्वामी मंदिरातून आठ हिरे नाहीसे


अमाप श्रीमंतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिरातून आठ हिरे नाहीसे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी मंदिरातून सोने नाहीसे झाले होते, त्यानंतर हे हिरे हरवले आहे. विशेष म्हणजे हे हिरे पद्मनाभस्वामी यांच्या मूर्तीचा भाग होते.

मंदिराच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेले अॅमिकस क्युरी व ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनीच हे हिरे गहाळ झाल्याची माहिती दिली आहे. देवाच्या मूर्तीच्या टिळ्याचा भाग असलेले हे आठ हिरे मे महिन्यात नाहिसे झाले आणि गुन्हे शाखा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे, असे ते म्हणाले.

या हिऱ्यांची अधिकृत किंमत 21 लाख रुपये एवढी असली, तरी ते पुरातन असल्यामुळे त्यांची किंमत खूप अधिक आहे, असे सुब्रमण्यम म्हणाल्याचे हिंदू या वृत्तपत्राने म्हटले आहे.

मंदिराच्या गर्भगृहावरील पोटमाळ्यात हे हिरे ठेवले होते आणि मूर्तीच्या दैनंदिन पूजेसाठी ते बाहेर काढण्यात येत. मंदिराच्या खजिनदारांना ते आढळले नाहीत तेव्हा मंदिराचे कार्यकारी अधिकारी के. एन. सतीश यांनी त्याची माहिती दिली.

यापूर्वी मंदिरातून 186 कोटी रुपयांचे सोने कहाळ झाले होते, असे विनोद राय समितीने केलेल्या विशेष लेखा परीक्षणात आढळले होते. ही घटना 10 महिन्यांपूर्वी घडली होती.