वेळेअगोदरच वृद्धत्व येण्यामागे स्मार्टफोनचा अतिवापर कारण


आज जगभरातील लोकांना स्मार्टफोन हा जीवनाचा भाग बनल्याची भावना आहे. अन्न वस्त्र व निवारा या आयुष्य जगण्यासाठी लागणार्‍या तीन गरजांमध्ये आता मोबाईल फोनही सामील झाला आहे. मोबाईलवरचे अवलंबित्व दिवसेनदिवस वाढत चालले असतानाच फोनचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

मोबाईल वापरणार्‍यांच्या हालचाली आय ट्रॅकरच्या सहाय्याने वैज्ञानिकांनी नोंदविल्या आहेत व त्याचा अभ्यास केला आहे. या प्रकारच्या २५२ प्रकारच्या हालचाली वैज्ञानिकांनी नोंदवून त्याचे अध्ययन केले तेव्हा वेळेअगोदरच वृद्धत्व येण्यामागे स्मार्टफोनचा अतिवापर असल्याचे त्यांना आढळून आले आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनवर बोलत बोलत रस्त्यातून चालताना तरूण वर्ग ८० वर्षाच्या वृद्धाप्रमाणे हालचाली करतो. म्हणजे तो अति हळू चालतो. प्रत्यक्षात फोनवर बोलत नसला तरी मेसेज वाचणे, पाठविणे असे उद्योग तरी करतोच. त्यामुळे त्याचा चालण्याचा वेग आपोआपच कमी होतो. शिवाय फोनच्या अतिवापराने मान, कंबर, पाठ यांची दुखणी वाढतात शियाय फोनमधून बाहेर पडणार्‍या किरणांमुळे डोळ्यांच्या विकारातही वाढ होते.

या शिवाय मोबाईल युजर्ससाठी जगभरातील सरकारांना पैसे खर्च करून वेगळ्या सुविधा द्याव्या लागतात ते वेगळेच. चीनमध्ये मोबाईल यूजर्ससाठी वेगळे पदपथ बांधले गेले आहेत. नेदरलँडमध्ये त्यांच्यासाठी अलग पेवमेंट आहेत. मोबाईल फोनमुळे नातेसंबंध कमी होत आहेत तसे कुटुंबातील संवादही कमी होतो आहे कारण युजर त्याचा बराचसा वेळ फोनवरच घालवित आहेत असेही दिसून आले आहे.

Leave a Comment