‘जीएसटी’नंतर तीन महिन्यात छापा सुधारीत ‘एमआरपी’


अन्यथा कडक कारवाई करणार; केंद्राचा उत्पादकांना इशारा
नवी दिल्ली: देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांना सुधारीत ‘एमआरपी’ छापण्यासाठी ३ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सुधारीत एमआरपी लागू न करणाऱ्या उत्पादकांवर कडक करावी करण्यात येईल; असा इशारा केंद्रीय खाद्यमंत्री रामविलास पासवान यांनी दिला आहे.

जीएसटी लागू झाल्यांनतर काही वस्तूंचे दर वाढणार आहेत; तर काहींचे कमी होणार आहेत. ज्या वस्तूंचे दर कमी होतील; त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. तसे ते मिळू न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; असे पासवान म्हणाले.

ग्राहकांना जीएसटी लागू झाल्यावर आपल्याला मिळणाऱ्या वस्तूंची किंमत जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उत्पादकांनी वेष्टणावर सुधारीत किंमत छापणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात येत आहे. उत्पादकांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अथवा कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे; असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment