पद्मनाभ मंदिरातून आठ प्राचीन हिरे गायब


देशातील श्रीमंत पद्मनाभ मंदिरातून पद्मनाभाच्या टिळ्यात लावले जाणारे आठ प्राचीन हिरे गायब झाले असल्याचे वृत्त आहे. या मंदिराच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत पारदर्शकता असावी यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या दाव्याचे प्रतिपादन करताना वकील गोपाल सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे.

पद्मनाभाच्या मस्तकावरील टिळ्यात हे हिरे होते. बाजारातील त्यांची किंमत जरी २१ लाख रूपये केली गेली असली तरी हे हिरे प्राचीन असल्याने तसेच प्राचीन मूर्तीच्या अंगावर घातले असल्याने त्याची किंमत कितीतरी पटीने अधिक भरेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. मंदिर खजिन्यातील मौल्यवान वस्तूंच्या तपासादरम्यान हिरे गायब असल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. केरळ पोलिस पुढील तपास करत आहेत. हे हिरे गर्भागारातील तिजोरीत ठेवले जात असत असेही समजते.

या मंदिरात कांही वर्षांपूर्वी तळातील लॉकर खोल्या उघडण्यात आल्यानंतर सोने, चांदी हिरे यांचे अमाप दागदागिने सापडले आहेत. देशातील सर्वात श्रीमंत अशी या मंदिराची ख्याती असून त्याच्या मालकीच्या दागदागिन्यांची किंमत दीड लाख कोटी रूपये असावी असा अंदाज केला गेला होता.