१५ ऑगस्टपर्यंत येणार २०० रूपयांची नवी नोट


जुलैच्या अखेरपर्यंतच २०० रूपयांची नवी नोट चलनात आणण्याचे प्रयत्न केले जात असून ही वेळ न साधल्यास १५ ऑगस्टपर्यंत ही नवी नोट चलनात खात्रीने सामील केली जाईल असे सरकारी प्रेस युनिटमधील अधिकार्‍यांनी सांगितले. होशंगाबाद येथील सरकारी प्रेस युनिटमध्ये २०० रूपयांची सँपल नोट तयार झाली असून तिची क्वालिटी व सिक्युरिटी फिचर चेक झाली आहेत. आता या नोटांची छपाई कर्नाटकातील मैसूर व प.बंगालमधील सालबोनी येथील प्रिटींग प्रेसमध्ये सुरू होत असल्याचे समजते.

नोटबंदीच्या निर्णयापूर्वीच रिझर्व्ह बँकेने छोटा नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला होता व त्याचाच भाग म्हणून बॅकांच्या कांही एटीएममध्ये फक्त १०० रूपयांच्या नोटा भरण्याचे आदेश दिले गेले होते. ५०० व २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून कमी होत असल्याचे निरीक्षणही रिझर्व्ह बँकेने नोंदविले होते. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दोन हजार रूपयांच्या नोटा कमी प्रमाणात दिल्या जात आहेत तर ५०० रूपयांच्या नोटांचे प्रमाण वाढविले गेले आहे. २०० रूपयांची नवी नोट चलनात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना पैशांची देवघेव अधिक सुलभ होणार आहे याची पडताळणी रिझव्हॅ बँकेने केली आहे. नवी नोट जुन्या १०० च्या नोटेप्रमाणे निळसर रंगाची असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment