अडीच वर्षांच्या चिमुरड्याची व्हाट्सॲपवर पावणेदोन लाखात विक्री!


लहान बालकांचे अपहरण करून व्हाट्सॲपवरून त्यांची विक्री करणाऱ्या दिल्लीतील टोळीचा छडा पोलिसांना लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात महिलांचा सहभाग असून यातील दोषींना पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीतील जामा मशिदीच्या बाहेर नमाजाची तयारी करत असताना त्यांच्या अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. ही घटना ५ जून रोजी घडली होती. त्याला दिल्ली शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी फिरविण्यात आले. त्यानंतर त्याचे चित्र व्हाट्सॲपवर टाकून त्याची विक्रीसाठी जाहिरात करण्यात आली. हे संपूर्ण रॅकेट तीन महिला चालवत होत्या आणि त्यातील एकीने मुलाचे छायाचित्र व्हाट्सॲपवर टाकून त्यासाठी १.८ लाख रुपयांची किंमत लावली.

या मुलाचे छायाचित्र टीव्हीवर दाखवण्यात आले होते. त्यावेळी एका व्यक्तीने ते व्हाट्सॲपवर पाहिले. त्याने ते टीव्हीवरील चित्राशी ताडून पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली, हे कळाल्यानंतर शेवटच्या महिलेने या मुलाला एका मंदिराबाहेर सोडले आणि तिनेच पोलिसांना मुलाबाबत कळविले.

पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि बक्षीस देण्यासाठी त्या महिलेला फोन लावला. तेव्हा तिचा फोन बंद असल्याचे आढळले. मात्र त्यांनी त्या महिलेला शोधून काढले आणि तिला व तिच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.राधा, सोनिया, सरोज अशी या तीन महिलांची नावे असून जान मोहम्मद हा त्यांचा सहकारी आहे.

“आम्हाला मूल हरविल्याची तक्रार मिळाली होती व आम्ही अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. खबऱ्याकडून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यात आली व टोळीला अटक केली,” असे पोलिस उपायुक्त मनदीपसिंग रंधवा यांनी सांगितले.

Leave a Comment