आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने रंगविल्या जुन्या पाट्या


वाढदिवसानिमित्त पार्ट्या आणि मेजवान्यांना फाटा देत धारवाड येथील एका व्यक्तीने आपल्या आईचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. या व्यक्तीने आपल्या परिसरातील अनेक वर्षांपासून खिळखिळ्या झालेल्या जुन्या पाट्या रंगवून काढल्या.

शिवाजी सूर्यवंशी असे या व्यक्तीचे नाव आहे. धारवाड शहरातील गांधीनगर भागात असलेले दिशादर्शक फलक अनेक दिवसांपासून वाईट अवस्थेत होते. त्यामुळे लोकांना आपला पत्ता देण्यास त्रास होत होता. त्यांनी या संबंधात तक्रार करूनही हुब्बळी- धारवाड महापालिकेने काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे आईच्या वाढदिवसाला भेट म्हणून या पाट्या रंगविण्याची कल्पना शिवाजी यांना सुचली.

“आमची आई गिरीजा गेल्याच आठवड्यात ५९ वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काही तरी करावे, असे मी व माझ्या भावाने ठरवले. आम्ही यासाठी रंगारी बोलावले होते, मात्र हे फलक पुसण्यास व रंगविण्यास अन्य नागरिकांनीही हातभार लावला,” असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

त्यांच्या या उपक्रमामुळे गांधीनगर येथील २५ पाट्या एका आठवड्यात रंगविण्यात आल्या आहेत. या पाट्यांवर नावांसोबत आता नजिकचे महत्त्वाचे ठिकाणही देण्यात आले आहे. आम्ही रंगांसाठी आणि रंगाऱ्यांना देण्यासाठी ७००० रुपये खर्च केले, अशी माहिती शिवाजी यांनी दिली.

Leave a Comment