जीएसटी गोळा करण्याचे अधिकार आयसीआयसीआय बँकेला


मुंबई -भारताच्या खासगी क्षेत्रातील एकत्रित मालमत्ता असलेली सर्वात मोठी बँक म्हणून आयसीआयसीआय बँक ओळखली जाते. तिच्यातर्फे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) गोळा करण्यासाठी वित्त मंत्रालयातर्फे अधिकृतता प्राप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मालकीच्या फर्म, भागीदारीतील फर्म तसेच खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना थेट सरकारला जीएसटी भरण्यासाठी ही सेवा मदत करणार आहे.

जीएसटीएन पोर्टलवर करदात्याला चलानची निर्मिती करायची आहे आणि देयके देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेची निवड करायची आहे. ही देयके कॉर्पोरेट आणि रिटेल बँकिंग व्यासपीठ, क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि आरटीजीएस/एनईएफटी सारख्या विविध डिजिटल पद्धतींनी भरता येणार आहेत. याशिवाय अगदी आयसीआयसीआय बँकेचा ग्राहक नसला तरीही, कुणीही व्यावसायिक प्रति चलान १०००० रुपयांपर्यंत जीएसटी भरू शकतो, हा कर देशभरातील बँकेच्या कुठल्याही शाखेत भरता येईल.

याबाबत माहिती देताना आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर म्हणाल्या की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा एक असा बंधारा आहे ज्यामुळे विविध लाभ होणार आहेत. जीएसटीमुळे राष्ट्रीय बाजारपेठांची निर्मिती, व्यवसायात सुलभता, अधिक चांगली उत्पादकता आणि सक्षमता आणि कर भरण्यात सुधापणा आदी गोष्टी शक्य होणार आहेत. आमच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा विस्तार करणे आणि जीएसटी गोळा करणे यासाठी आम्ही अधिकृत झालो आहोत, याचा आनंदच आहे. या अंतर्गत आयसीआयसीआय बँक `रेडी फॉर यू, रेडी फॉर टुमॉरो’ या तत्त्वज्ञानावर कार्यरत असेल, बँक नेहमीच ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार नावीन्यपूर्णतेने सेवा देण्यास वचनबद्ध आहे. ही नवी तंत्रज्ञान सेवा आमच्या शाखांच्या नेटवर्कबरोबर विस्तारीत स्वरूपात जोडण्यात आली आहे, तिच्याद्वारे करदात्यांना कर भरण्यास सुलभता प्राप्त होणार आहे आणि जीएसटी प्रकारात राष्ट्रीय मिशन पूर्ण करता येणार आहे.

Leave a Comment