भारतात जितकी मंदिरे आहेत तितक्याच त्यांच्या कथाही आहेत. चोरी करणे हे पाप असल्याचे लहानपणापासून आपल्याला शिकविले जाते. मात्र उत्तराखंडमधील एक मंदिर असेही आहे, जेथे चोरी केली तरच तेथील चूडामणी माता भाविकाची इच्छापूर्ती करते. सिद्धपीठ चुडामणी माता मंदिर नावाचे हे मंदिर उत्तराखंडातील रूडकीपासून जवळच असलेल्या चुडीयला गावात आहे. आषाढ महिन्यात येथे मोठी जत्रा भरते व देशभरातून भाविक या मातेच्या दर्शनासाठी येत असतात.
चोरी केली तरच इच्छापूर्ती करणारी चुडामणी माता
असे सांगतात की ज्या जोडप्याला आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा आहे ते येथे देवीच्या दर्शनाला येतात व देवीच्या पायाजवळ वाहिलेल्या लाकडी तुकड्याची चोरी करतात. मुलगा झाला की पुन्हा दर्शनाला येऊन मुलाच्या हातून लाकडाचा तुकडा देवीला अर्पण करतात. १८०५ साली लंढोरा राजाने हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. या राजाला मुलगा नव्हता. तो एकदा रात्री शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याला तेथे मातापिंडीचे दर्शन झाले. त्याने पुत्र प्राप्तीसाठी या पिंडीला नवस केला व नवस फळल्यावर या जागी मंदिर बांधले.
या देवीची अशी कथा सांगतात की दक्ष राजाने सतीचे पती शिव यांना आमंत्रण न केल्याने चिडलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले. त्यानंतर शिव म्हणजेच महादेवाने सतीचे जळालेले शरीर घेऊन दुःखात हिमालयात भ्रमण केले तेव्हा जागोजागी सतीचे अवयव पडले व ती सर्व शक्तीस्थाने झाली. या ठिकाणी मात्र सतीचा अवयव नाही तर हातातील चूडा पडला म्हणून ती चुडामणी माता म्हणून प्रसिद्ध झाली. या मंदिराजवळच मातेचे भक्त बाबा बनखंडी यांचीही समाधी आहे.