वॉशिंग्टन – एका मोठ्या हॅकर्स ग्रुपने ‘नासा म्हणतं… परग्रहवासी येत आहेत…’ या मथळ्याखाली एक व्हिडीओ अपलोड करून खळबळ उडवून दिली होती. जगभरात या दाव्यानंतर विविध चर्चांना उधाण येऊनही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाकडून स्पष्टीकरण देण्यात येत नव्हते, नासावर त्यामुळे टीका होत होती. पण आता नासाच्या विज्ञान मिशन संचालनालयाचे असोसिएट एडमिनिस्ट्रेटर थॉमस झुर्बुचेन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
नासाचे एलियन्सच्या अस्तित्वाबाबत स्पष्टीकरण
नासाने ब्रम्हांडात एलियन्सच्या अस्तित्वाचा शोध घेतला असून त्याबाबत लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचा दावा तीन दिवसांपूर्वी एनॉनिमस या हॅकर्स ग्रुपने केला होता. नासा अनेक वर्षांपासून एलियन्सचे अस्तित्व शोधण्यावर काम करत आहे, आता एलियन्सचे अस्तित्व असल्याचे सबळ पुरावे नासाकडे उपलब्ध झाले असून लवकरच ते याबाबत खुलासा करणार आहेत, असा एका संदेश १२ मिनिटांच्या व्हिडीओतून देण्यात आला होता.
नासाने गेल्या काही वर्षांमध्ये एलियन्सबाबत केलेले संशोधन आणि नासाचे असोसिएट एडमिनिस्ट्रेटर थॉमस झुर्बुचेन यांच्या एप्रिल महिन्यातील अमेरिकी संसदेमधील भाषणाचा व्हिडीओ वापरून हा दावा करण्यात आला होता. ‘आम्ही परग्रहवासीयांचे अस्तित्व शोधण्याच्या, इतिहासातील सर्वात सखोल आणि अद्वितिय शोधाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, असे या व्हिडीओत झुर्बिचेन बोलताना दिसले. आता या सर्व प्रकारावर झुर्बिचेन यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
नासाकडे सध्यातरी परग्रहवासीयांविषयी घोषणा करण्यासारखे काही नाही. पण माध्यमांमध्ये आलेले वृत्त चुकीचे असून आपण ब्रम्हांडात एकटेच आहोत का? हे आम्हालाही अजून नक्की माहिती नाही. पण या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आमचे अनेक मिशन सुरू असल्याचे ट्विट करून एलियन्सच्या अस्तित्वाबाबत नासा सध्यातरी कोणताही खुलासा करणार नसल्याचे झुर्बिचेन यांनी स्पष्ट केले आहे.