या मंदिरातून कृष्णाने केले होते रूक्मिणीहरण


विष्णुच्या दशावतारात सर्वाधिक रोचक व सर्वाधिक पूजनीय अवतार म्हणजे कृष्णावतार. कृ ष्णाने या अवतारात अनेक लिला केल्यामुळे त्याला लिलाधर असेही नांव पडले होते. रूक्मी राजपुत्राची बहिण रूक्मिणी हिला मंदिरातून पळवून नेऊन कृष्णाने तिच्याशी विवाह केला होता. ही घटनाही अनेक नाटक सिमेमांना विषय पुरवून गेली आहे.

ज्या मंदिरातून कृष्णाने रूक्मिणीला पळवून नेले ते मंदिर आजही अस्तित्त्वात आहे. हे मंदिर उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्हयात अनूपशहर तालुक्यात असून ते अवंतिका मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. जहांगीराबादपासून १५ किमी अंतरावर गंगातीरी अतिशय शांत वातावरणात हे मंदिर असून याच्याजवळ कोणतेही गांव अथवा वस्ती नाही. त्यामुळे येथे आजही शांतता असते व त्यामुळे अनेक साधुसंत येथे तपस्येसाठी येतात. या मंदिराचे उल्लेख महाभारत व भगवतगीतेतही येतात. दूरदूरच्या भागातून शेकडोंच्या संख्येने भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

येथे अंबिका देवी साक्षात प्रकट झाली होती असे मानले जाते. मंदिरात भगवती जगदंबा व सतीदेवी अशा दोन मूर्ती एकत्र आहेत. यांची पूजा अवंतिका देवी म्हणून केली जाते. या मंदिरात देवीला वस्त्र दिले जात नाही तर भाविक सिंदूर व घरच्या तुपापासून केलेली आभूषणे देवीला वाहतात. अविवाहित मुलींनी येथे येऊन सिंदूर व असली घीची आभूषणे देवीला वाहिली तर त्यांना मनासारखा पती मिळतो असाही येथे विश्वास आहे. रूक्मिणीनेही कृष्ण पती म्हणून मिळावा म्हणून याच देवीची पूजा केली होती असेही सांगितले जाते.

Leave a Comment