जीएसटीमुळे या ९ क्षेत्रात नोकरीच्या संधी


नवी दिल्ली – जीएसटी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारात वाढ होण्याची शक्यता असून तत्काळ एक लाख रोजगार कर आणि खाते त्याचबरोबर डाटा अॅनालिसिस करण्यासाठी उपलब्ध होतील. औपचारिक रोजगारामध्ये वार्षिक १० ते १३ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

वाहन, गृह सजावट, ई-कॉमर्स, मीडिया, मनोरंजन, सिमेंट, आयटी, बँकिंग, दूरसंचार या क्षेत्रात तत्काळ रोजगार वाढ होईल. त्याचबरोबर इंडियन स्टाफिंग फेडरेशनचे अध्यक्ष ऋतुपर्ण चक्रवर्ती यांनी जीएसटीनंतर वस्तूंच्या खरेदी-विक्रीमध्ये तेजीने वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे. नगदीचा पुरवठा आणखी सुलभ झाल्याने कंपन्यांचाही नफा वाढेल. या सर्वांना आता करात पारदर्शकता आणावी लागणार असल्यामुळे कंपन्यांमधील असंघटित क्षेत्रात राहण्याचे आकर्षण कमी होईल. त्यामुळे संघटित क्षेत्र तेजीने वाढेल. यामुळे या क्षेत्रातील रोजगार १० ते १३ टक्क्यांच्या गतीने वाढतील.

कमीत कमी एक लाख रोजगार जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच वाढण्याची अपेक्षा असल्याचे ‘ग्लोबलहंट’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील गोयल यांनी म्हटले आहे. जीएसटीसंबंधित घडामोडींमध्ये ५० ते ६० हजार रोजगार निघतील. छोट्या आणि मध्यम (एसएमई) कंपन्या देखील दररोजच्या जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी थर्ड पार्टी अकाउंट फर्मकडे काम सोपवण्याची शक्यता आहे.

विदेशी गुंतवणूकदार जीएसटीनंतर बिझनेस करणे अधिक सुलभ झाल्याने भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित होतील, असे मत मॉन्सटरडॉटकॉमचे आशिया-प्रशांत क्षेत्राचे व्यवस्थापकीय संचालक संजय मोदी यांनी मांडले आहे. यामुळे औपचारिक क्षेत्रातील संधी वाढतील. असे असले तरी लेबरनेट सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गायत्री वासुदेवन यांच्या मतानुसार रोजगारासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक्सच्या अडचणी दूर कराव्या लागतील.

Leave a Comment