आता तुमचे मेल वाचणे गुगल थांबवणार


गुगल मेलचा उपयोग करणाऱ्या वापरकर्त्यांचे मेल आता गुगल वाचणार नाही. खुद्द कंपनीनेच एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. अर्थात हा बदल या वर्षाच्या शेवटी अंमलात येणार आहे.

गुगल मेल वापरणाऱ्यांना जाहिराती दाखविण्यासाठी त्यांच्या पत्रव्यवहारातील मजकूर संगणक वाचतात. हा खासगीपणाचा भंग आहे, अशी तक्रार अनेक कार्यकर्त्यांनी केली होती. या संदर्भात गुगलच्या विरोधात खटलेही दाखल झाले आहेत. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.

“‘जी सूट’मध्ये जाहिरातींच्या वैयक्तिकीकरणासाठी जीमेलच्या माहितीचा उपयोग करणे आधीच बंद केले आहे. आता आमच्या मोफत जीमेलमध्येही त्याचे अनुकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या बदलानंतर वैयक्तिक आवडीनुसार जाहिराती दाखविण्यासाठी ग्राहकांच्या जीमेलमधील मजकूर वाचण्यात येणार नाही,”असे गुगलने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

जीमेलमधील जाहिराती चालूच राहणार आहेत, मात्र त्यासाठी वापरकर्त्यांच्या इमेलचे वाचन करण्याऐवजी गुगल सर्च किंवा यूट्यूब यांसारख्या स्रोतांमधून मिळालेल्या माहितीचा वापर करण्यात येईल आणि त्यानुसार जाहिराती दाखवल्या जातील. मात्र स्पॅम विरोधी, फिशिंग विरोधी आणि मालवेयर शोधून काढण्याच्या सेवेसाठी गुगल इमेलचे वाचन सुरूच ठेवणार आहे.

Leave a Comment