पाच मित्रांची यारीदोस्ती


खरा मित्र तोच जो कोणत्याही प्रसंगात आपली साथ सोडत नाही. अमेरिकेतील पाच मित्रांनी खरी दोस्ती काय असते याचे उहाहरण घालून दिले आहे. हे पाची मित्र नुकतेच चर्चेत आले आहेत व त्यासाठी कारण ठरले आहेत गेली ३५ वर्ष एकाच जागी भेटून, एकाच पोझ मध्ये त्यांनी काढलेले फोटो. १९८२ पासून सुरू झालेला हा सिलसिला २०१७ पर्यंत सुरूच राहिला आहे व यापुढेही सुरू राहील अशी शक्यता आहे.


जॉन वार्डला, मार्क रेसर, डलास बर्नी, जॉन मोलोमी, जॉन डिक्सन हे त्यांची शाळा सेंट बार्बरा पासून एकत्र आहेत. त्यांनी १९८२ साली म्हणजे ते साधारण १९ वर्षांचे असताना कॅलिफोर्निया व ओरेझॉन सीमेवरील कोपके येथे भटकंती करताना बेंचवर बसून एक फोटो काढला. त्याचवेळी त्यांनी दर पाच वर्षांनी आपण याच जागी भेटून फोटो काढायचा असे ठरविले. १९८७ ची वेळ जमली. त्यावेळी त्यांनी पूर्वीच्या फोटोप्रमाणेच त्याच क्रमाने बसून फोटो काढला व दर पाच वर्षांनी भेटण्याचा निर्धार आणखी पक्का झाला. कुणीही कुठेही नोकरीनिमित्ताने गेला तरी दर पाच वर्षांनी येथे यायचेच हे ठरले.

विशेष म्हणजे या दोस्तांनी ही प्रथा अजून सुरू ठेवली असून त्यांचा लेटेस्ट २०१७ सालातला त्याच पोझमधला फोटो त्यांनी शेअर केला आहे. आता हे मित्र ५५ वर्षांचे आहेत. भेटीची जागा तीच असली तरी त्यांचे चेहरे मात्र जाणविण्याइतके बदलले आहेत.

Leave a Comment