मजबूत हाडांसाठी अन्न


आपल्या शरीरातील हाडे मजबूत असण्याची फार गरज आहे. कारण शरीराचा ताठरपणा हा हाडांवर अवलंबून आहे. हाडे मजबूत नसल्यास वृध्दावस्थेत खूप त्रास होतो. परंतु हाडे मजबूत करण्याचे काम मात्र पौगंडावस्थेत किंवा तारुण्यातच करावे लागते. त्यासाठी फळांचा आहार फार महत्त्वाचा समजला जातो. कारण हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम फळांतून मिळते. कॅल्शियमचा पुरवठा फळांइतकाच किंवा फळांपेक्षा जास्त हा दुग्धजन्य पदार्थांतून होत असतो. अशा पदार्थातून हाडांशिवाय दातही मजबूत होतात. कॅल्शियमसाठी हिरव्या भाज्या अधिक उपयुक्त ठरतात. हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम बरोबरच जीवनसत्त्व क हेही उपलब्ध असते.

त्याशिवाय भाज्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारची पोषणद्रव्ये असतात. त्यातील ड जीवनसत्व हे हाडांसाठीचे सर्वात महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. ज्यांच्या शरीरात ड जीवनसत्व कमी असेल त्यांच्या हाडांची झीज लवकर होते आणि ती छोट्या मोठ्या अपघातांनीही दुखावले जातात, मोडतात. हाडांसाठी मॅग्नेशियमचेही महत्त्व समजले जाते. पुरुषांनी दररोज किमान ४०० मिलीग्रॅम आणि स्त्रियांनी दररोज किमान ३२० मिलीग्रॅम एवढे मॅग्नेशियम पोटात जाईल यावर लक्ष ठेवले पाहिजे. बदाम, सोयाबीन आणि पालक यातून एवढे मॅग्नेशियम मिळू शकते. के व्हिटॅमीन हेही हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते.

केवळ हाडांसाठीच नाहीतर सर्वसाधारण निरामय जीवन जगण्यासाठी व्यायाम हा आवश्यक असतोच त्यामुळे व्यायामाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सरळ उभे राहणे, ताडासन करणे, पळणे, चालणे आणि नृत्य करणे या व्यायामांनी हाडांच्या मजबुतीला मदत होते. भारत्तोलन (वेटलिफ्टिंग) हा व्यायामसुध्दा हाडांच्या मजबुतीस उपयुक्त ठरतो. हाडांच्या बरोबार स्नायूंची मजबुतीसुध्दा आवश्यक असते. भारत्तोलनाने स्नायू मजबूत होण्यास मदत होते. वय वाढल्यानंतर सगळ्याच प्रकारचे व्यायाम करणे अशक्य होऊन बसते. म्हणून अगदी वृध्दावस्थेत फार व्यायामाचा आग्रह न धरता साधारण हालचालींना महत्त्व द्यावे. त्यामुळेही स्नायू आणि हाडांची मजबुती राखली जाते. ड जीवनसत्व हे हाडांसाठी आवश्यक आहे. पण ते केवळ आहारातूनच मिळते असे समजण्याचे काही कारण नाही. स्वच्छ सूर्यप्रकाश हासुध्दा ड जीवनसत्वाचा पुरवठा करू शकतो. त्वचेची झळाळी कायम राखण्यासाठी काही लोक उन्हापासून दूर राहतात. परंतु तसे न करता शरीराला काही प्रमाणात का होईना सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे.