“मंगळावर जाण्यापूर्वी चंद्रावर वसाहत करणे आवश्यक”


मनुष्याने मंगळावर जाण्यापूर्वी चंद्रावर वसाहत करणे आणि तेथे दीर्घकाळ राहणे आवश्यक आहे, असे नासातील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. अंतराळात राहण्यासाठी किरणोत्सर्ग आणि अन्य परिणामांचा सामना करण्याबाबत चाचण्या सुरू झाल्या आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

“मंगळावर जाण्यासाठी पाच ते सहा महिने लागतील. तिथे एक वर्ष रहावे लागेल आणि मग परतीचा प्रवास सुरू होईल. म्हणजे मंगळावर केवळ जाऊन येण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. त्यामुळे एवढा दीर्घकाळ किरणोत्सर्गापासून कसे वाचणार आणि त्यांना पुरेल एवढे साहित्य कसे देणार,” असे लेफ्टनंट जनरल लॅरी जी. जेम्स म्हणाले. ते नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे उपसंचालक आहेत.

“वर्ष २०३० च्या सुरूवातीस मंगळावर माणसांनी जाऊन येण्याची मोहीम हाती घेण्याचा आमचा विचार आहे,” असे जेम्स यांनी चेन्नईत बोलताना सांगितले. मंगळावर अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या स्पेस लाँच सिस्टिम या रॉकेटच्या चाचण्या २०१९ साली होणार आहेत.

मंगळावर जाण्याच्या मोहिमा या अंटार्क्टिकावर जाणाऱ्या प्रारंभीच्या मोहिमांसारख्या होत्या, अशी तुलनाही त्यांनी केली.

Leave a Comment