कार्ससाठी व्हिव्हीआयपी नंबर घेण्याची क्रेझ दिल्ली वासियांत वाढत चालली असल्याचा अनुभव नुकताच आला आहे. दिल्ली परिवहन विभागाने वेबसाईटवर या नंबर्सच्या लिलावाची माहिती देताच ०००१ या नंबरला तब्बल १६ लाख रूपये मोजले गेल्याचे समजते. दिल्लीच्या पालम लँड हॉस्पिटॅलिटी प्रा.लिमिटेडकडून या नंबरची खरेदी झाली आहे.
व्हीव्हीआयपी नंबर ०००१ साठी मोजले १६ लाख रूपये
परिवहन विभागाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार यापूर्वी सर्वाधिक रक्कम १२.५० लाख नंबरसाठी मोजली गेली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये ०००७ या नंबरसाठी १०.४० लाख रूपये तर फेब्रुवारी २०१५ मध्ये ०००९ या नंबरसाठी ८.५० लाख रूपये मोजले गेले होते. व्हीआयपी नंबर घेण्याची क्रेझ वाढत चालल्याने सरकारी महसूलात चांगली वाढ होत आहे. या संदर्भात असे सांगितले जाते की असे नंबर घेण्यामागे लोकांमध्ये कांही समज आहेत. म्हणजे जन्मतारखेचा नंबर घेणे, शुभ आकडे असलेल्या नंबर घेणे यामुळे समृद्धी येते असा समज आहे व यामुळे आपल्याला लकी असलेले व्हीआयपी नंबरचा शोध लोक घेत राहतात. गेल्या ६ महिन्यात दिल्ली परिवहन विभागाने २९ व्हीआयपी नंबर विकून ५४.७० लाख रूपयांची कमाई केली आहे. गतवर्षी १५१ नंबर विकून २.२८ कोटी रूपयांचा महसूल गोळा झाला होता.
साधारण दिवाळीच्या वेळी व्हीव्हीआयपी नंबरची मागणी लक्षणीयरित्या वाढते असाही अनुभव परिवहन अधिकारी सांगतात.