शेतीत व्यावसायिकता आवश्यक


आपल्या देशातल्या शेती व्यवसायासमोर अनेक समस्या आहेत. या समस्या कधी नव्हे एवढ्या गुंतागुंतीच्याही झालेल्या आहेत. त्यावर नेमका उपाय काय या बाबत उदंड चर्चा होऊन सुध्दा स्थिती सुधारण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. मात्र काही सोप्या गोष्टी या दृष्टीने जरूर सांगाव्याशा वाटतात. शेतीचा सर्वात मोठा प्रश्‍न शेतीमालाला मिळणारा भाव हा आहे. किंबहुना वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर शेतीमालाला पर्याप्त भाव मिळत नाही ही शेतीमालाची समस्या आहे. यावर स्वामिनाथन आयोग, हमीभाव असे उपाय सांगितले जातात आणि ते उपाय प्रभावी ठरणारेसुध्दा आहेत. परंतु आपल्या शेतीमालाचे भाव कोसळू नयेत यासाठी शेतकर्‍यांनीही काही पथ्ये पाळली पाहिजेत.
या ठिकाणी शेतकर्‍यांना उपदेश करण्याचा हेतू नाही. परंतु शेतकर्‍यांकडून होणारी एक चूक न दाखवल्यास शेतकर्‍यांचेच नुकसान होणार आहे. म्हणून ही गोष्ट या ठिकाणी नमूद करत आहोत. शेतीमालाचे भाव बर्‍याचअंशी मागणी आणि पुरवठा यावर ठरत असतात. शेतीमालाच्या बाजारावर शेतकर्‍यांचे नियंत्रण नाही. ही गोष्ट खरी. परंतु शेतीमालाच्या पुरवठ्यावर तरी त्याचे नियंत्रण असले पाहिजे.

तेव्हा सगळ्या शेतकर्‍यांनी मिळून तारतम्याने काही निर्णय घेऊन एकाच एका पिकाच्या मागे न जाता विविध प्रकारची पिके घेतली पाहिजेत. तसे केल्याने निरनिराळ्या मालाचा पुरवठा आवश्यक तेवढाच होत राहील आणि शेतीमालाचे भाव फार कोसळण्याचे संकट शेतकर्‍यांवर येणार नाही. दुर्दैवाने असे होत नाही. एखाद्या शेतीमालाला एखाद्या वर्षी चांगला भाव मिळाला की पुढच्या वर्षी सगळे शेतकरी तेच पीक घेतात. कारण गतवर्षी चांगला भाव मिळालेला असतो आणि यावर्षीही तो टिकेल आणि चार पैसे जास्त मिळतील अशी आशा त्याला वाटत असते. तेव्हा शेतकरी एकच एक पीक असे मोठ्या प्रमाणावर घेतात आणि त्यांची आवक वाढली की भाव कोसळतात. तेव्हा यंदा ज्या मालाला जास्त भाव मिळाला आहे त्या पिकाच्या मागे सर्वांनीच न लागता सर्वच प्रकारची पिके संतुलीत प्रमाणात घेतली पाहिजेत. १९९० साली उसाची टंचाई होती म्हणून उसाला चांगला भाव मिळाला आणि त्यावर्षी नेमका चांगला पाऊस पडला. पावसामुळे झालेली पाण्याची उपलब्धता आणि उसाला भाव मिळतो ही आशा यामुळे शेतकर्‍यांनी एवढा ऊस लावला की १९९१ साली ऊस उदंड झाला. कित्येक शेतकर्‍यांचे ऊस कारखान्यांना नेता आले नाहीत. काही शेतकर्‍यांनी उभा ऊस जाळून टाकला तर ज्यांचा ऊस कारखान्याने नेला नाही त्यांना सरकारकडून भरपाई द्यावी लागली.

१९९१ सालची उसाची अतिरिक्त उपलब्धता आणि त्यातून झालेली अनेक शेतकर्‍यांची शोकांतिका आजही लोकांच्या लक्षात आहे. या वर्षी अशी अवस्था तुरीच्या बाबतीत होण्याची संभावना आहे. म्हणून हा लेखनप्रपंच. २०१६ साली तुरीची दाळ एवढी कमी उपलब्ध झाली की तिचे किरकोळीतले भाव सव्वा दोनशे रुपये प्रति किलो असे कल्पनातीत वाढले. त्यावर्षी अनेक शेतकर्‍यांच्या तुरीला १५ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला. मात्र तुरीची दाळ महाग झाल्याने सामान्य लोक सरकावर टीका करायला लागले. त्यामुळे सरकारने तुरीचे उत्पन्न वाढवण्याचा चंग बांधला. लोकांना प्रोत्साहन दिले. क्विंटलमागे २०० रुपये बोनस जाहीर केला आणि सर्वत्र प्रचाराचा असा धुराळा उडवला की लोकांनी त्याला बळी पडून प्रचंड प्रमाणावर तूर पेरली. एखाद्या पिकाच्या बाबतीत निसर्गाचा फटका, भाव कोसळणे आणि मुळात कमी लागवड असे दुष्टचक्र फिरताना दिसते. पण गतवर्षी तुरीच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी चांगल्या घडल्या. मुळात पेरा चांगला झाला. सरकारने भाव जाहीर केला आणि निसर्गानेसुध्दा चांगली साथ दिली. त्यामुळे अमाप तूर पिकली. त्यामुळे शेतकर्‍यांची अशी पंचाईत झाली हे तर आपण अनुभवतच आहोत.

शेतीमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत नेहमीच दोन टोके गाठली जातात ती कशी याचा अनुभव तुरीने आणून दिला. गतवर्षी ज्या शेतकर्‍यांच्या तुरीला १५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता त्यांना यंदा ५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणेसुध्दा मुश्किल होऊन बसले. हे संकट सरकारच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीमुळे थोडे सुसह्य झाले परंतु आता अशी एक भीती वाटत आहे की तुरीचा असा अनुभव आल्यामुळे शेतकरी यंदा तुरीच्या वाटेला जाणार नाहीत. किंबहुना आताच शेतकरी तसे बोलत आहेत. यात एक धोका आहे. गतवर्षी तुरीचा अनुभव वाईट आला म्हणून यंदा शेतकर्‍यांनी तूर कमी पिकवली तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुरीची टंचाई, परदेशातून आयात आणि प्रचंड भाववाढ अशी संकटे कोसळू शकतात. एकाच पिकाच्या मागे लागण्याच्या प्रवृत्तीचा असा परिणाम संभवतो. सरकारने त्यातल्या त्यात एक पाऊल चांगले टाकले आहे. तुरीचा किमान खरेदी दर २०० रुपये प्रति क्विंटलने वाढवला आहे. शिवाय गतवर्षी तूर उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपये बोनस जाहीर केला होता तो यंदा ४०० रुपये केला आहे. म्हणजे काही लोकांनी यंदा तुरीचे नाव घ्यायचेच नाही असे म्हणून कानाला खडा लावला असेल त्यांनी तसे न करता तुरीचा पेरा करावा कारण यावर्षी तुरीच्या बाबतीत गतवर्षीसारखी शोकांतिका होणार नाही.

Leave a Comment