बंगळूरू – अनेक जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन साईट्सवरून घरपोच दिल्या जातात. त्यामुळे जीवनशैलीतही आता वेगाने बदल होत आहेत. त्याचबरोबर घरपोच सेवेतही झपाट्याने सुधारणा होत आहे. अनेक वस्तू आता घरबसल्या मिळत असल्याने ग्राहकांसाठी ते सोयीचे झाले आहे. आता डिझेलही इतर वस्तूप्रमाणे घरपोच मिळणार आहे. ही सुविधा बेंगळुरूमध्ये सुरू झाली आहे. तिथे डिझेलही घरपोच दिले जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने अशाप्रकारची सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा काही आठवड्यांपूर्वी केली होती. त्यानुसार १५ जूनपासून बेंगळुरूत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ९५० लीटर क्षमतेच्या तीन वाहनांतून डिझेल ग्राहकांच्या घरी पोच केले जात आहे.
डिझेलही आता घरपोच मिळणार
आतापर्यंत ५ हजार लिटर डिझेल कंपनीने ग्राहकांच्या घरी पोच केले आहे. त्यासाठी सेवाशुल्कही आकारले जात आहे. १०० लिटर डिझेल पोहोचवण्यासाठी ९९ रुपये सेवा शुल्क आकारण्यात येत असून त्याहून अधिक डिझेलसाठी प्रत्येक लिटरमागे १ रुपया शुल्क आकारण्यात येणार आहे. आता डिझेल पोहचवत असलेली कंपनी नवी असून कंपनीला २० मोठे ग्राहक मिळाले आहेत. ज्यामध्ये १६ शाळांचा तर ४ अपार्टमेंट्सचा समावेश आहे. या शाळांच्या साधारण २५० ते ३०० स्कूलबस आहेत.
ऑनलाईन ऑर्डर हे डिझेल मागविण्यासाठी करण्यात येणार आहे. याशिवाय फोनवरुन तसेच फ्री अॅप्लिकेशनव्दारेही डिझेल मागवता येणार आहे. धनबाद येथील आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या ३२ वर्षीय आशिषकुमार गुप्ता यांच्या पेट्रोलपंपावरुन डिझेल ग्राहकांना घरपोच दिले जात आहे. याविषयी पेट्रोलियम मंत्रालयाशी मागील काही दिवसांपासून चर्चा चालू होती आणि त्याला मंत्रालयाने उत्तम प्रतिसाद दिला आहे.