सारे जग झाले योगमय


भारत हा देश एक दिवस जगातली एक महाशक्ती म्हणून उभा राहील असे स्वप्न आपण पहात आहोत. तशी काही कल्पना करायला लागलो की आपल्या डोळ्यासमोर अमेरिक, रशिया आणि चीन अशा महाशक्ती उभ्या राहतात. भारत देश तशीच लष्करी आणि राजकीय महाशक्ती म्हणून पुढे येईल असे आपल्याला वाटायला लागते. अलीकडच्या काळात आपल्या सर्वांना डॉ. अब्दुल कलाम यांनी हे स्वप्न दाखवून प्रेरित केलेले आहे पण त्यांच्याही पूर्वी योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांनीही हा देश एक महाशक्ती म्हणून पुढे येईल असे भाकीत वर्तवलेले होते याचा आपल्याला विसर पडतो. डॉ. कलाम यांच्या आणि या दोन महापुरुषांच्या भाकितात मात्र एक फरक आहे. डॉ. कलाम यांचे भाकीत हे एका शास्त्रज्ञाने केलेले भाकीत होते. त्यांनी ते आकडेवारी आणि आर्थिक परिमाणे वापरून वर्तवले होते पण स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी केलेले भविष्यकथन हे योग्यांनी केलेले कथन होते. त्यांना हा देश महाशक्ती होईल म्हणजे तो जगाचा गुरू होईल असे म्हणायचे होते.

जगाचा गुरू होणे म्हणजे जगाला मार्गदर्शन करणे. तेव्हा भारत देश महाशक्ती होऊन जगाला मार्गदर्शन करील असे या दोघा द्रष्ट्यांना म्हणाचे होते. कारण जग आता अनेक नवनव्या वैचारिक संभ्रमात घेरले जायला लागले आहे. मानव प्राणी मानसिक आणि वैचारिक वादळात सापडला आहे. आपण आपले राहणीमान वाढवले की सुखी होणार असे समजून या मानवाने विज्ञानाला साधन बनवून निसर्गावर कथित विजय मिळवण्याचा खटाटोप केला आहे. तंत्रज्ञानाच्या तर किती पराकोटीच्या प्रगतीचे टोक त्याने गाठले आहे. एवढ्या भौतिक सुखांची रेलचेल असतानाही त्याला सुख मिळालेले नाही आणि आपण एवढी सारी प्रगती करूनही सुखी का होत नाही या प्रश्‍नाने या मानवाला त्रस्त केले आहे. या प्रश्‍नाचे उत्तर तंत्रज्ञानात आणि विज्ञानात नाही. ते अध्यात्मात आहे आणि जगाला त्याची माहितीही झाली आहे. तेव्हा मानसिक असमाधानाच्या या चक्रव्यूहातून आपल्याला अध्यात्माच्या या जन्मभूमीतूनच मार्गदर्शन होऊ शकेल असा विश्‍वास जगाला वाटत होता. तशी सुरूवातही झाली होती आणि हळूहळु भारतातून अनेक कथित प्रगत देेशांना मार्गदर्शन करणारे अनेक आध्यात्मिक गुरू तिकडे गेलेही होते. नरेन्द्र मोदी यांनी हा प्रवाह गतिमान करण्यासाठी जागतिक योग दिनाची कल्पना संयुक्त राष्ट्रांच्या गळी उतरवली.

आपल्याला आता या ज्ञानाची खरी गरज आहे याची जाणीव अनेक देेशांतल्या जिज्ञासूंना व्हायला लागलीच होती आणि नेमकी याच वेळी मोदी यांनी जगासमोर योग दिनाची कल्पना मांडली त्यामुळे ती कल्पना ताबडतोब उचलली गेली आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा ठराव केवळ मंजूरच झाला असे नाही तर तो विक्रमी बहुमताने मंजूर झाला. जग ज्याची प्रतिक्षा करीत होते तेच आपोआप समोर आले म्हणून केवळ काही दिवसांच्या सूचनेने जगातल्या १९० देशांत मोठ्या उत्स्फूर्तपणे योग दिनाचे सोहळे साजरे झाले. हजारो लोक एखाद्या मैदानावर जमतात आणि सामूहिकपणे योगासने करून भारतीयांनी जगाला दिलेल्या या विद्येचा सन्मान करतातहे मनाला मोहून टाकणारे दृश्य अनेक शहरांत दिसायला लागले. ही कल्पना राबवताना पंतप्रधान मोदी यांनी जगाला ही गोष्ट परोपरींनी सांगितली आहे की योगाकडे केवळ आसने किंवा शारीरिक आरोग्य मिळवून देणारा व्यायाम प्रकार म्हणून न पाहता एक जीवन पद्धती म्हणून पहावे असे आवाहन केले आहे ते मोठे समर्पक आहे कारण मानवाचे प्रश्‍न केवळ आसने करण्याने सुटणार नाहीत तर ते जीवन पद्धतीतल्या बदलाने सुटणार आहेत.

आज जगाच्या पाठीवर अनेक देेशांत हा समारंभ होत आहे. अगदी पाकिस्तानातही तो होत आहे. तिथेही लोक एकत्र येऊन मंत्र म्हणून योगासने करीत आहेत. आपल्याला आता जगाचा गुरू व्हायचे असेल तर योग ही कसली जीवन पद्धती आहे याचे ज्ञान जगाला द्यावे लागेल. या जीवन पद्धतीत पैशाला प्राधान्य नाही. पैसा हा माणसाला हवाच कारण पैशाच्या अभावाने माणूस दु:खी होत असतो. तेव्हा पैशांचा अभावही असता कामा नये आणि पैशाचा प्रभावही असता कामा नये. पैसा धर्माने कमवावा आणि तो मोक्ष मिळवण्यासाठी कमवावा असे या जीवनपद्धतीत म्हटले आहे. ते आता जगाला शिकवावे लागणार आहे कारण पैसा, अडका, वैभव, सुख आणि सोयी यांच्या बाबतीतले तारतम्य हरवले असल्यानेची ही मानवी जात दु:खी झाली आहे. १८९३ साली स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत केलेल्या आपल्या त्या जगाला हलवून सोडणार्‍या भाषणात असे म्हटले होते की, अमेरिकेचा शोध कोलंबसाने लावला असला तरीही या अमेरिकेला धर्म म्हणजे काय हे शिकवण्याचे काम आम्ही करणार आहोत. स्वामीजींच्या या वचनाचे प्रत्यंतर आता येत आहे आणि मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे या जन्माचे औचित्य काय या गोष्टी आपण आता योग दिनाच्या माध्यमातून अमेरिकेला शिकवीत आहोत. आपण जगाला हे तत्त्वज्ञान सांगत आहोत. हे अगदी अभावितपणे घडले आहे पण त्यामागे अनेक ऋषीमुनींची आणि आधुनिक काळातल्या विचारवंतांची तप:श्‍चर्या आहे.

Leave a Comment