पृथ्वीसारख्या १० ग्रहांचा शोध: जीवसृष्टीची शक्यता


न्यूयॉर्क: सूर्यमंडळाच्या पलीकडे खगोलशास्त्रज्ञांना आणखी २१९ नव्या ग्रहांचा शोध लागला आहे. त्यापैकी १० ग्रहांचे आकारमान आणि तापमान पृथ्वीप्रमाणेच असून त्या ठिकाणी जीवसृष्टी अस्तित्वात असल्याची किंवा त्यासाठी अनुकूल वातावरण असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.

नासाच्या केप्लर अवकाश दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणात २ लाख ताऱ्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या निरीक्षणातच हा नवा शोध लागला आहे. नव्याने सापडलेल्या ग्रहांपैकी खडकाळ पृष्ठभाग असलेल्या १० ग्रहांच्या आकारमान, तापमानाच्या अनुकूलतेप्रमाणेच या ग्रहांचे त्यांच्या सूर्यापासूनचे अंतरही एवढे सुरक्षित आहे; की त्यावर पाणी अस्तित्वात असू शकेल. पाणी हे जीवसृष्टीचे उगमस्थान आहे; अशी शास्त्रज्ञांची धारणा आहे.

‘आपल्यासमोर हाच प्रश्न आहे की; या अवकाशात आपण एकटेच आहोत का?’ (अर्थात पृथ्वी हा एकटाच जीवसृष्टी असलेला ग्रह आहे का?) कदाचित केप्लरने आज अप्रत्यक्षपणे हे सूचित केले आहे की; नाही. आपण एकटे नाही;’ असे उद्गार केप्लर प्रकल्पाचे शास्त्रज्ञ मारिओ पेरेझ यांनी पत्रकारांना संबोधित करताना काढले.

पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टीची शक्यता असणारे आणखी ग्रह अस्तित्वात आहेत का; याचा अभ्यास करण्यासाठी नासाने सन २००९ पासून केप्लर प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पात आजपर्यंत अपरिचित असलेल्या ४ हजार ३४ ग्रहांचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी तब्बल ५० ग्रह पृथ्वीइतक्याच तापमान व आकारमानाचे आढळले आहेत. या प्रकल्पाच्या निरीक्षणांचे विश्लेषण केल्यानंतर उत्साहजनक परिणाम हाती आले असून आता प्रत्यक्ष जीवसृष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे; अशी शास्त्रज्ञांची धारणा आहे.

Leave a Comment