स्विस बँकेत भारतीयांपेक्षा सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशांचा जास्त पैसा


नवी दिल्ली : स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेत गुंतवणुक असलेल्या भारतीयांची यादी देण्याचे मान्य केल्याने आता मोठ घबाड हाती लागणार असे दिसत होते. पण थोड्याच दिवसात यावर विरझण पडले आहे. कारण स्विस बँकांमध्ये इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकांचा खूप कमी पैसा असल्याची माहिती स्वित्झर्लंडंच्या खासगी बँकर्सच्या समूहाने दिली आहे.

भारतीयांपेक्षा सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशातील पैसा स्विस बँकेत जास्त असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार स्विस बँकेत भारतीयांचे फक्त १.२ बिलियन फ्रँक (सुमारे ८,३९२ कोटी रूपये) आहेत. २०१५ च्या अखेरपर्यंतचा हा आकडा आहे.

ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फर्मेशन (एईओई) अंतर्गत स्वित्झर्लंडने दोनच दिवसांपूर्वी भारत आणि इतर ४० देशांबरोबर बँकिंगविषयक माहिती आदान-प्रदान करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यामुळे २०१९ पासून स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती भारताला मिळू शकेल. स्वित्झर्लंडच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पण भारताबाबत विशेष चिंता नसल्याचे जिनेव्हा येथील असोसिएशन ऑफ स्विस खासगी बँकेने म्हटले. या संघटनेचे व्यवस्थापक जेन लँगो यांनी स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांचा पैसा खूप कमी असल्याच्या वृत्तास दुजारो दिला.

दरम्यान, मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईला स्वित्झर्लंडने एईओई विधेयक संमत केल्यानंतर मोठे यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे. पण आता हा तर फुसका बारच होता अशा प्रतिक्रया जनमानसातून उमटल्या आहेत. स्विस बँकेत दडवून ठेवलेल्या काळ्या पैशांचा माग काढण्यासाठीही सरकारचे अनेक प्रयत्न सुरू होते. मोदी सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. या करारामुळे आता स्वित्झर्लंडकडून भारताला स्विस बँकेतील संशयास्पद खात्यांची माहिती दिली जाणार आहे.

Leave a Comment