फेसबुकनेच दिली कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांना


नवी दिल्ली – नुकतेच तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल एप्लीकेशनमधून तुमची वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचे वृत्त आल्यामुळे सर्वांसमोर वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगाची काळी बाजू येत आहे. खुद्द फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाच अशाच एका वाईट प्रकाराचा फटका बसला आहे. संशयित दहशतवाद्यांना जगभरात लोकप्रिय असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती दिल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडल्याची माहिती समोर येते आहे. या संदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिले असून फेसबुकच्या २२ विभागांमधील तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांची माहिती तांत्रिक बिघाडामुळे संशयित दहशतवाद्यांना मिळाली असल्याचे यात म्हटले आहे.

संशयित दहशतवाद्यांना फेसबुकच्या एक हजार कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांचा प्रचार-प्रसार आणि अश्लिल पोस्ट रोखण्याचे काम हे सर्व कर्मचारी करतात. या कर्मचाऱ्यांचीच माहिती सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या बगमुळे लीक झाली आहे. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी संशयित दहशतवाद्यांना फेसबुकवर बॅन केले, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती बॅन करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून एका कर्मचाऱ्याने राजीनामा देत घरचा रस्ता धरला आहे.

नोव्हेंबरमध्ये तांत्रिक बिघाड फेसबुकने दुरुस्त केला होता. पण तो बिघाड कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली. वाढत्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी आणि त्यासंदर्भातील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकने विशेष सुविधा सुरु केली आहे. यानंतर फेसबुकने संबंधित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे.

दरम्यान फेसबुककडून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, भावना भडकावणाऱ्या पोस्ट डिलीट केल्या जाणार आहेत. त्याबद्दलच्या तंत्रज्ञानादरम्यानच फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली. फेसबुकनेदेखील चूक झाल्याचे मान्य केले असून असा प्रकार टाळण्यासाठी तांत्रिक बदल करु, असे म्हटले आहे.

Leave a Comment