अमेझिंग जपानच्या विचित्र गोष्टी


निसर्गसौंदर्य, अतिशय देखणा, एखाद्या नाजूक फुलासारखा अशा अनेक विशेषणांनी प्रसिद्ध असलेला उगवत्या सूर्याचा देश जपान जितका पर्यटकांसाठी मोहमयी तितकाच तो तेथे पाळल्या जात असलेल्या अनेक संकेतांबद्दल मनोरंजकही आहे. जगभरात कुठेच आढळणार नाहीत अशा अनेक प्रथा व जागा येथे सहजी पाहायला, ऐकायला मिळतात. बुलेट ट्रेन, अत्याधुनिक व तरीही मजबूत अशा अनेक प्रकारच्या कार्स, रोबोट क्षेत्र यात जपानची आघाडी आहे मात्र तरीही येथे खूपच अनोखे कायदेकानूनही आहेत.

उदाहरण द्यायचे झाले तर जगभरात कुठेही ऑफीसमध्ये काम करताना कुणी झोपले असेल तर त्याला सर्वसाधारणपणे मेमो दिला जातो अथवा बॉस त्यांची चांगलीच कानउघडणी करतो. जपानमध्ये मात्र ऑफिसमध्ये कुणी झोपत असेल तर त्याला कामाचा जास्त ताण आहे असे समजले जाते व त्याची प्रतिमा एकदम सुधारते. अर्थात काही जपानी याचा फायदा उठवितात आणि मुद्दामही झोपा काढतात. सर्व जगभर जपानची ही कार्यालयीन झोप चर्चेचा विषय ठरली आहे.


येथील कामगार कायदे अतिशय कडक आहेत. येथे कुणालाही कामावरून सहज काढून टाकता येत नाही. काढलेच तर त्यासाठी भरभक्कम मोबदला द्यावा लागतो. म्हणून मग मालक लोक अशा लोकांना अतिशय कंटाळवाणी कामे देतात जेणेकरून हे लोक आपणहूनच नोकरी सोडतात. अशा कामात दिवसभर टिव्हीस्क्रीन कडे पाहात बसणे अशी कामेही असतात. जपानमध्ये दत्तक घेण्याची परंपरा आहे पण जगभरात सर्वसामान्यपणे लहान मुले दत्तक घेतली जातात तर जपानमध्ये २८ ते ३० वयोगटातील मुले दत्तक घेण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. हे दत्तक साधारणपणे घरचा उद्योग सांभाळण्यास मुलगा नसेल अथवा असला तरी उद्योग सांभाळण्यास पात्र नसेल तर घेतले जातात.


एकांतवासात जगणे म्हणजे हिकीकीमोरी हा जपानचा खास प्रकार आहे. येथे अनेक लोक खास जागी, एखाद्या खोलीत अथवा घरातच बाहेरच्या कुणाशीही संबंध न येऊ देताना जगतात. बाहेरच्या जगाशी त्यांचा कांही संबंध नसतो. जपानमध्ये असे किमान ७ ते १० लाख लोक आहेत. जगभरात दात मोत्यासारखे व सरळ असावेत हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते तर जपानमध्ये वेडेवाकडे दात करून घेण्याचे फॅड आहे. चांगले सरळ दात कॉस्मेटिक सर्जरी करून मुद्दाम वेडेवाकडे केले जातात. तसेच सर्व दुनियेत टीप देण्याची प्रथा आहे मात्र जपानमध्ये टीप दिली जात नाही. कारण तेथील लोकांना आपल्याला कुणी टीप देतेय हा अपमान वाटतो. वेटर, वाहनचालक टीप दिली गेली तर वरीष्ठांकडे तक्रार करतात किंवा टीप परत देतात.

Leave a Comment