त्रिपुरात काय होणार ?


उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पार पडली आणि आता आणखी काही राज्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. खरे तर येत्या वर्षभरात ईशान्य भारतातल्या त्रिपुरा या लहान राज्यातही निवडणूक होणार आहे पण त्याची कोणीच दखल घेत नाही कारण या भागातली राज्ये लहान तर आहेतच पण राष्ट्रीय राजकारणात फारशी प्रभावी ठरणारी नाहीत. असे असले तरीही त्रिपुराच्या राजकारणाला आणि निवडणुकीला महत्त्व दिले जाते कारण हे राज्य राष्ट्रीय राजकारणाला एक दिशा देणारे ठरणार आहे. देशात कमजोर होत असलेल्या कम्युनिष्टांच्या हातातील अडीच राज्यात ते अर्धे राज्य आहे.

केरळ आणि प. बंगाल ही दोन राज्ये साम्यवादी पक्षांच्या हातात होती. साम्यवादी पक्षांतही डावे कम्युनिष्ट तेवढे बाकी राहिले आहेत. त्यांना राजकारणात माकपा असे म्हणतात. माकपाने बंगाल आणि केरळात आपले वर्चस्व टिकवले असले तरी ते काही निर्विवाद नाही. या दोन्ही राज्यांत त्यांनी इतर काही पक्षांशी युती करून आपला पगडा कायम ठेवला आहे. त्रिपुरात मात्र माकपाने शत प्रतिशत माकपाचे वर्चस्व टिकवले आहे. भाजपाने ईशान्य भारतात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण त्रिपुरात माकपाला नमवून आपला वट्ट वाढवणे म्हणावे तेवढे सोपे नाही. या राज्यात माकपाचे नेते माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली सलग पाच वेळा सत्ता मिळवली आहे व तीही कोणाशी युती न करता.

त्रिपुरा विधानसभेत ६० जागा आहेत. २००८ साली माकपाने त्यातल्या ४९ जागा जिंकल्या होत्या पण २०१३ साली या जागांत एका जागेची भर पडली. मतांच्या टक्केवारीही साधारण अशीच वाढ झाली. २००८ साली ५१ टक्के तर २०१३ साली ५२ टक्के मते मिळाली. माणिक सरकार यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे आणि त्यांनी राज्याला दहशतवादी शक्तीपासून वाचवलेले आहे. त्यांनी त्रिपुरातल्या अतिरेकी संघटनांना काबूत ठेवले असून त्यांच्या विरोधात लष्कराला जादा अधिकार देणारा वादग्रस्त कायदा कधीच वापरलेला नाही. त्यांनी राज्यातल्या जनतेला शांतता आणि प्रगती असे दोन मंत्र दिले आहेत. त्यामुळे त्यांना त्रिपुराची जनता चांगलीच ओळखले. ते मुख्यमंत्री असले तरीही दरमहा केवळ एक रुपया वेतन घेतात. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाने चांगले यश मिळवले असून सत्ताधारी माकपाला मोठे आव्हान दिले आहे पण तरीही माकपाला तिथे सहाव्यांदा सत्ता मिळवणे फार अवघड जाणार नाही.

Leave a Comment