मध्यावधीच्या वावड्या


महाराष्ट्रात सध्या कृषी कर्ज माफीच्या निर्णयाच्या पाठोपाठ मध्यावधी निवडणुकांच्या वावड्या उठवल्या जात आहेत. तशा मध्यावधीच्या वावड्या उठण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यावर चर्चा झालेली आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने कृृषी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांना आता त्याचा लाभ उठवण्यासाठी मध्यावधी निवडणुका घेण्याचा मोह होऊ शकतो, असे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे. या मोहापोटीच भारतीय जनता पार्टी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेऊन शिवसेनेचा आपल्या मागे लागलेला ससेमिरा कमी करण्याचा प्रयत्न करील असे राजकारणातील मातब्बर निरीक्षकांना वाटते आणि त्यात बरेच तथ्यही आहे. कारण भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा सर्व स्तरावरील निवडणुका जिंकून लोक आपल्या मागे आहेत हे सिध्द करून दिले आहे. भाजपाच्या या विजयामागे इतर अनेक कारणे आहेत. परंतु मराठा मोर्चा, धनगर समाजाचे आरक्षण आदी अनेक अडचणीचे मुद्दे समोर असतानासुध्दा भाजपाने हे यश मिळवलेले आहे.

या यशांमुळे भाजपाचा आत्मविश्‍वास बराच वाढलेला आहे. त्यातच आता कर्जमाफीच्या घोषणेची भर पडली आहे. शेतकर्‍यांची कर्जे सरसकट माफ करण्याचा चांगला फायदा सत्ताधारी पक्षाला होत असतो, असा आजवरचा अनुभव आहे. २००८ साली केंद्रातल्या मनमोहनसिंग सरकारने अशीच देशव्यापी कर्जमाफी केली होती. ही घोषणा झाली तेव्हाच विरोधी पक्षांनी, कॉंग्रेसने निवडणुका जिंकल्यात जमा आहेत अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि झालेही तसेच. २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला २१६ जागा मिळाल्या. तत्पूर्वी झालेल्या २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जेमतेम १४३ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये २००९ साली एवढी मोठी वाढ झाली. तिचे श्रेय कृषी कर्जमाफीलाच दिले पाहिजे. महाराष्ट्रात नेमके असेच वातावरण निर्माण झालेले आहे. जनता भाजपाच्या मागे असल्याचे विविध निवडणुकांनी सिध्दही करून दिले आहे आणि कृषी कर्जमाफीने भाजपाची शेतकर्‍यांमधली लोकप्रियता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेतली गेली तर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळू शकेल असा त्या पक्षाचा अंदाज आहे आणि त्या अंदाजामुळेच भाजपाचे नेते मध्यावधी निवडणुकीचा डाव टाकतील अशी शक्यता अन्य पक्षांना वाटते.

भारतीय जनता पार्टीने राज्यभरात ३ हजार निरीक्षक स्वयंसेवक गावागावात पाठवले आहेत आणि हे स्वयंसेवक त्या त्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेऊन हवेचा अंदाज घेत आहेत. या सर्व स्वयंसेवकांनी पक्षश्रेष्ठींना पाठवलेल्या आपल्या अहवालामध्ये सध्याचे वातावरण भारतीय जनता पार्टीला अनुकूल असल्याचा निर्वाळा दिला आहे. एवढेच नव्हे तर ही हवा अधिक अनुकूल करण्यासाठी काय करता येईल यावरही या स्वयंसेवकांनी लोकांची मते आजमावली आहेत आणि त्या दिशेने वाटचाल करून भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भाजपाचा प्रयोग करण्याच्या विचारात आहे. आता सरकार स्थापन झालेच तर ते शिवसेनेची मदत न घेता करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अतीशय पोरकटपणाने राजकारण करून भारतीय जनता पार्टीला उलट अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली आहे. शिवसेनेच्या अनेक हितचिंतकांनी उध्दव ठाकरे यांना अधिक परिपक्वपणा दाखवण्याचे थेट आणि अडून अडून सल्ले दिलेही आहेत. परंंतु उध्दव ठाकरे यांच्या डोक्यात प्रकाश पडण्याचा काही संभव दिसत नाही. परिणामी, मध्यावधी निवडणुका झाल्याच तर शिवसेनेचे बळ कमी होण्याची शक्यता आहे.

निवडणुका मध्यावधी होवोत की न होवोत त्या जेव्हा केव्हा होतील तेव्हा शिवसेनेचे बळ निश्‍चितपणे घटलेले दिसणार आहे. याचा अंदाज शिवसेनेलाही आलेला आहे. त्यामुळे नेमके काय करावे याचा अंदाज उध्दव ठाकरे यांना येत नाही. ते जमेल तिथे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही तरी बोलून स्वतःचेच हसे करून घेत आहेत. एका बाजूला शिवसेनेची ही अवस्था असताना अन्य विरोधकांमध्ये म्हणजेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले असल्यामुळे जनतेच्या मनातली या पक्षाची प्रतिमा पुरती डागाळलेली आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु ते अशा प्रयत्नांचा वेग जसा जसा वाढवत चालले आहेत तसे पक्षातले एकेक नेते नव्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडत चालले आहेत. शरद पवार यांचा प्रभावसुध्दा आता घसरत चालला आहे. शेतकर्‍यांच्या संपाच्या प्रकरणात त्यांनी आपली प्रतिमा सुधरवून घेण्यासाठी बरीच कोशीश केली. ते निष्णात राजकारणी आहेत परंतु शेवटी राजकारणी कितीही हुशार असला तरी परिस्थिती अनुकूल असेल तर त्याच्या हुशारीचा उपयोग होतो. पवारांना परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला रान मोकळे मिळाले आहे. त्यांच्याकडून कधीही मध्यावधी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment