भारत लठ्ठ मुलांचा देश


भारतामध्ये मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत मोठे विसंगत चित्र दिसते. एका बाजूला पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे कुपोषित असलेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुसर्‍या बाजूला अती पोषण झालेल्या लठ्ठ मुलांची संख्याही तेवढीच मोठी आहे. एकूण लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात चीनच्या पाठोपाठ म्हणजे दुसरा क्रमांक आहे. लहान मुलांतील लठ्ठपणातसुध्दा भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतातील एक कोटी ४४ लाख मुले मर्यादेपेक्षा अधिक वजनाची असल्याचे आढळले आहे. जगभरात लठ्ठपणा आणि त्या संबंधातील आजारांनी व्यथित असलेल्या लोकांची संख्या २०० कोटी आहे आणि या कारणांनी मरण पावणार्‍यांची संख्याही वरचेवर वाढत चालली आहे.

२०१५ साली जगभरातील ४० लाख मृत्यू हे लठ्ठपणा आणि त्यातून उद्भवणार्‍या आजारातून झाले होते. ही माहिती देणार्‍या अहवालावरून तज्ञांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लठ्ठपणा हेच एक चिंतेचे सामाजिक कारण झाल्यामुळे पुढच्या पिढीवर त्याचे काय परिणाम होतील या विषयी चिंता व्यक्त केली जात आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या नियतकालिकात जगातल्या लठ्ठपणासंबंधीच्या समस्यांसंबंधीची चर्चा करण्यात आली आहे. जगातील २० देश हे लठ्ठ लोकांचे देश म्हणून नमूद करण्यात आले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केल्यास अमेरिकेत लठ्ठांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. अमेरिकेतील १३ टक्के मुले लठ्ठ आहेत.

प्रौढ व्यक्तीतील लठ्ठपणाचा विचार केला असता इजिप्तचा जगात पहिला क्रमांक लागतो. या देशातील ३५ टक्के प्रौढ लोक हे लठ्ठ आहेत. लहान मुले आणि प्रौढ या दोन्हींमध्येही लठ्ठपणाचे कमीत कमी प्रमाण असलेल्या देशांच्या यादीत बांगला देश आणि व्हिएतनाम या दोन देशांचा समावेश झाला आहे. या देशात लठ्ठपणाचे प्रमाण केवळ १ टक्का आहे. चीनमध्ये १ कोटी ५३ लाख मुले तर भारतामध्ये १ कोटी ४४ लाख मुले लठ्ठ आहेत. ही संख्या मोठी असली तरी या दोन देशातील लठ्ठ मुलांचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी आहे. अमेरिकेत ७ कोटी ९४ लाख प्रौढ लठ्ठ असून चीनमध्ये त्यांची संख्या ५ कोटी ७३ लाख एवढी आहे. लठ्ठपणाच्या बाबतीत १९५ देशांची पाहणी करण्यात आली. लठ्ठपणाचे आरोग्यावर नेमके कसे परिणाम होतात हा अभ्यासाचा विषय होता.

Leave a Comment