
रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी कंपनीवर चढलेला कर्जाचा बोजा लक्षात घेऊन या वर्षी विनावेतन व विना कमिशन काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. अनिल अंबानींना सहकार्य करण्यासाठी कंपनीच्या कांही वरीष्ठ अधिकार्यांनीही २१ दिवसांचा पगार न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
अनिल अंबानी या वर्षी विनावेतन काम करणार
रिलायन्स कम्युनिकेशन्सने ज्या ऋणकोंकडून पैसे घेतले आहेत त्यांचे पैसे परत करणे कंपनीला शक्य झालेले नाही. या कर्जाच्या पुनर्गठणासाठी डिसेंबर पर्यंत मुदत दिली गेली आहे. म्हणजे सात महिन्यांच्या काळात कंपनीला ४५ हजार कोटींचे कर्ज फेडायचे आहे. कम्युनिकेशन क्षेत्रात ग्राहक मिळविण्याची व ते टिकविण्याची स्पर्धा तीव्र बनली असून रिलायन्सने गेल्या वर्षात २ कोटी ग्राहक गमावले आहेत.
कंपनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर अखेर एअरसेल व बुकफिल्ड या कंपन्यांचे सौदे पूर्ण होतील व त्यातून २० हजार कोटी रूपयांची कर्जफेड केली जाईल. कंपनीच्या कर्जाच्या रकमेतील वाढीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे व मुकेश अंबांनींच्या रिलायन्स जिओमुळे रिलायन्स कम्युनिकेशनला जास्त नुकसान सोसावे लागत असल्याची चर्चाही जोरावर आहे.
