आता कर भरण्यासाठी लागणार नाही सीएची गरज !


नवी दिल्ली : सरकारने करदात्यांना आयकर भरणे अधिक सोपं व्हावं, या उद्देशाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयकर भरण्यासाठी ‘ऑल इंडिया आयटीआर’ या सरकारी ई-फायलिंग वेबसाईटने अॅप विकसित केले आहे.

अखिल भारतीय आयटीआरचे संस्थापक आणि संचालक विकास दहिया यांच्या माहितीनुसार, एक मोबाईल अॅप आयकर फायलिंग करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासाठी आणि स्वत:च आपला आयकर भरता यावा, यासाठी विकसित करण्यात आले आहे. आयकर भरण्यासाठी यातील तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज या अॅपमुळे भासणार नाही आणि त्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाही.

आयटीआरचे हे मोबाईल अॅप यूझर फ्रेण्डली आहे. आयकर भरण्यासोबतच रिफंड स्टेटस, एचआरएमधील सूट इत्यादी सुविधाही या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे करदात्यांना करासंदर्भात अनेक प्रश्न किंवा शंका असतात. अशा प्रश्नांचे निरसन करण्यासाठीही विशेष सुविधा यात असेल. अनेकदा करदात्यांना अशा प्रश्नांसाठी चार्टर्ड अकाऊंटंटची मदत घ्यावी लागते. हे अॅप गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Leave a Comment