शिक्षणाची चुकलेली दिेशा


दहावीचा निकाल लागला आणि उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींच्या सोबतच पालकांनीही उच्च शिक्षणाची तसेच उच्च दर्जाच्या भवितव्याची स्वप्ने पहायला सुरूवात केली. अशा वातावरणात उत्साह असतो पण त्यात उत्साहाबरोबरच संभ्रमही तसाच दिसत असतो कारण शिक्षणाची दिशा चुकलेली आहे. आधी तर आपण मुलांना मिळालेल्या गुणांमुळे चक्रावून जात असतो. ज्या लोकांनी जुन्या काळात दहावीची परीक्षा दिली असेल त्यांना हा निकाल पाहून एका बाजूने आनंदही होतो आणि आश्‍चर्यही वाटते. कारण त्यांच्या काळात असे निकाल लागत नव्हते. फार हुशार मुले प्रथम श्रेणीत यायची. आता प्रथम श्रेणी हे नवल राहिलेले नाही. ९० टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४८ हजार एवढी आहे. १०० टक्के गुण मिळवणारांची संख्याही वाढत चालली आहे. मुलांचे वाढत चाललेले हे गुण त्यांच्या वाढत चाललेल्या हुशारीचे गमक मानायचे का? की परीक्षा पद्धतीत होत असलेल्या बदलामुळे हे गुण वाढले आहेत ? चर्चा तर सुरू आहेे पण या प्रश्‍नांची उत्तरे साधी आणि सरळ नाहीत.

१०० टक्के गुण मिळवणे हे शाळेतूनच मिळणार्‍या गुणांमुळे शक्य झाले आहे हे नाकारता येत नाही. पण सामान्यत: मुले आज हुशार झाली आहेत आणि त्यामुळेही ती अधिक गुण मिळवायला लागली आहेत हेही नाकारता येत नाही. नवी पिढी फार हुशार आहे याचा तर आपल्याला पदोपदी अनुभव येत असतो. आजकालची लहान मुले आजोबांना आलेली कसलीही संगणकीय अडचण क्षणात सोडवतात हे तर आपण पहातच असतो. या पिढीची वाढलेली गुणवत्ता हे तर जादा गुणांचे कारण आहेच पण त्यांंना शिकवणीच्या रूपाने जादा अभ्यास करण्याचीही संधी मिळत आहे. नाही म्हटले तरी समाजात शैक्षणिक वातावरण चांगले तयार होत आहे. परीक्षा कशी असते आणि तिच्यात जादा गुण कसे मिळवावेत याच्या तंत्राचेही शिक्षण आजच्या मुलांना मिळायला लागले आहे. या सगळ्या बदलांचा संकलित परिणाम म्हणून असे निकाल लागत आहेत. खरे तर शिक्षण म्हणजे ज्ञानप्राप्ती. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी शिक्षण असतेे. त्याने माणसाच्या आयुष्यातही परिवर्तन होते आणि समाजातही मोठा बदल घडतो. आपल्या समाजात आपण आज जो बदल अनुभवत आहोत तो शिक्षणानेच झालेला आहे. तेव्हा शिक्षण हे समाजाच्या आणि व्यक्तीच्या परिवर्तनासाठी असते असे आपण म्हटले तर वावगे ठरणार नाही मात्र आताच काय पण पूर्वीही कोणा पालकांना आपल्या मुला मुलींना शाळेत घालताना त्याच्यात आणि समाजात परिवर्तन घडावे म्हणून घातलेले नसते.

मुलगा किंवा मुलगी शिकून शहाणी व्हावी यापेक्षा शिकून चांगली कमावती व्हावी याच हेतूने त्यांना शाळेत घातलेले असते. म्हणूनच शिक्षण कशासाठी या प्रश्‍नाचे उत्तर, शिक्षण चांगल्या नोकरीसाठी असे आल्यास नवल वाटायला नको. पालकांचा हा दृष्टीकोन असला तरीही शिक्षणाने मुलांच्या विचारात बदल होतात हे काही नाकारता येत नाही. तसा तो होत असला तरीही तो पालकांचा हेतू नाही आणि असे पालक आपल्या मुलांत काय बदल झालाय हे कधी तपासून पहात नाहीत. आपल्या मुलाच्या शिक्षणाची वाटचाल चांगल्या पगाराच्या नोकरीच्या दिशेनेच होत आहे की नाही याबाबत मात्र ते कमालीचे दक्ष असतात. चांगली नोकरी ही चांगल्या डिग्रीला आणि चांगल्या मार्कांवरूनच मिळत असल्याने नकळतपणे पालकही आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळेल असे शिक्षण देण्याबाबत आग्रही असतात आणि त्याला चांगले गुण मिळावेत याबाबतही सावध असतात. त्यासाठी काहीही करायला तयार असतात. अशा या पदवीच्या आणि गुणांच्या स्पर्धेतूनच शिक्षणाची दिशा ठरायला लागली आहे.

आपल्या देशातले शेतकरी ज्या पिकाला चांगला भाव मिळतो तेच पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर तेच पीक घेतले की माल जास्त पिकतो आणि त्याचे भाव पडतात. दोन वर्षांपूर्वी तुरीला चांगला भाव मिळाला म्हणून यंदा सर्वांनी चढाओढीने तुरीचेच पीक घेतले. त्यावर यंदा तुरीची काय अवस्था झाली याचा अनुभव आपण घेतच आहोत. नेमकी अशीच स्थिती आपल्या शिक्षणाची झाली आहे. बी. एड. झालेल्या काही लोकांना मागणी आली आणि त्यांना चांगल्या नोकर्‍या लागून छान पगार मिळायला लागला की सर्वच लोक बी. एड.च्या मागे धावायला लागले. तुरीचे पीक अमाप येतात व्यापार्‍यांनी शेतकर्‍याची लूट केली तसेच शिक्षण क्षेत्रातल्या व्यापार्‍यांनी या बी. एड.च्या मागे लागलेल्या विद्यार्थ्यांची लूट केली. आता ते सारे विद्यार्थी पस्तावत आहेत. समाजात कधी अशीच स्थिती शिक्षणाचीही झाली आहे. ज्या शिक्षणाने चांगल्या वेतनाची नोकरी मिळते त्या शिक्षणाकडे सगळेच लोंढे पळायला लागतात. कालांतराने तिकडे गर्दी होऊन त्या शिक्षणाचे महत्त्व कमी झाले की मुले तिकडे जात नाहीत. सध्या तांत्रिक शिक्षणाचे असेच झाले आहे आणि तंत्रनिकेतनातल्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या शोधात फिरावे लागत आहे. दहावीचे निकाल लागले की अशा लोंढयांचे दर्शन घडते. त्यातून आधी अपेक्षा आणि नंतर अपेक्षाभंगातून येणारी निराशा यापेक्षा काही निर्माण होत नाही. हे टाळण्यासाठी मुला मुलींना दहावीच्या शिक्षणानंतर उच्च शिक्षणाची दिशा ठरवताना त्यांच्या आवडीला प्राधान्य दिले पाहिजे तरच हे लोेंढे कमी होतील.

Leave a Comment